गुजरात विद्यापीठातील अभ्यासक्रमात मोदी आणि आरएसएसच्या इतिहासाचा समावेश; वादाला नवे तोंड फुटले

SHARE:

गुजरात – बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आधारित एक अनोखा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. ‘मोदी तत्व’ असे शीर्षक असलेला हा अभ्यासक्रम, विद्यापीठाच्या समाजशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांतर्गत शिकवला जाईल. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज व सयाजीराव गायकवाड तिसरे यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींशी संबंधित विषयांसोबत शिकवला जाईल. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसचे खासदार तारिक अनवर यांनी या निर्णयावरून टीका केली आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, मोदी तत्त्व, स्वदेशी ज्ञान प्रणाली, हिंदू धर्माचा अभ्यास आणि राष्ट्रवाद हे विषय आता बीए समाजशास्त्र अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षातील आणि दोन वर्षांच्या एमए समाजशास्त्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षातील १० पेपर्सचा भाग असतील. भारताचे समाजशास्त्र, हिंदू समाजशास्त्र आणि देशभक्तीचे समाजशास्त्र या शीर्षकांचे हे मॉड्यूल प्रत्येकी चार क्रेडिटचे अभ्यासक्रम असून, जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी एमएसयूमधील समाजशास्त्र शिक्षणाच्या पुनर्रचनेचा भाग आहेत.

हा अभ्यासक्रम समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विरेंद्र सिंह यांनी तयार केला असून ते एमएसयूच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या मते, हा उपक्रम म्हणजे एक असे समाजशास्त्रीय शिक्षण विकसित करण्याचा प्रयत्न आहे, जे व्यावहारिक, संशोधन-आधारित आणि ऐतिहासिकदृष्ट्या भक्कम असूनही वर्तमान संदर्भांशी जोडलेले असेल.

विद्यापीठाच्या मते, या अभ्यासक्रमाचा उद्ददेश्य शैक्षणिक चौकटीला भारताच्या सभ्यताविषयक ज्ञान परंपरेशी, समकालीन शासनप्रणालीशी आणि सामाजिक वास्तवाशी एकीकृत करणे आहे. डॉ. सिंग यांनी शुक्रवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की देशभक्तीचे समाजशास्त्र या मॉड्यूलचा भाग असलेला ‘मोदी तत्त्व’ हा अभ्यासक्रम, जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांच्या करिश्माई शक्तीच्या सिद्धांतावर आधारित, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा अभ्यास आहे.

ते म्हणाले कि ‘मोदी तत्त्व’ हा अभ्यासक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी या समकालीन राजकीय व्यक्तिमत्त्वाचा, करिश्माई नेतृत्व, धोरणात्मक दृष्टिकोन आणि जनसंपर्क यांचा एक केस स्टडी म्हणून अभ्यास करतो. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय आणि जागतिक राजकीय चर्चेत एक अपरिहार्य व्यक्तिमत्व बनले आहेत. सध्याच्या पिढीने ५० वर्षांनंतर त्यावर चर्चा करण्याऐवजी आताच अभ्यास करावा, अशी आमची इच्छा आहे.

अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समावेश करण्यासंदर्भात सिंग म्हणाले की ही कल्पना गुजरातमधील दुर्गम गावांमध्ये केलेल्या क्षेत्रीय अभ्यासातून सुचली, जिथे विद्यार्थ्यांनी तळागाळातील संघटनेच्या कार्याचे निरीक्षण केले. त्यांनी वृत्तपत्राला सांगितले कि या अभ्यासक्रमात आरएसएस केवळ एक विचारप्रणाली म्हणून नव्हे, तर तळागाळातील संघटना, सामाजिक कार्य आणि संवादाचे एक आदर्श म्हणून शिकवले जाईल.

या निर्णयावर काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान न दिलेल्या संघटनेची मते अभ्यासक्रमात समाविष्ट केली जात आहेत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी आरोप केला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही बलिदान दिले नाही किंवा त्या काळात कोणतीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली नाही. त्यांनी असा आरोप केला की लोकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ पाहिला आहे, ज्या दरम्यान महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आणि भ्रष्टाचाराची समस्या अधिकच गंभीर झाली. त्यांच्या मते, आज देशातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात घसरण होत आहे.

Leave a Comment