समृद्धी महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक; आरोपींकडून 9 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

SHARE:

अहिल्यानगर – समृद्धी महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 9 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर समृद्धी महामार्गावर लूटमार करणारी आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात निखील बद्रीनारायण गोरे रा. नुतन वसाहत, अंबड, जि. जालना, शिवनाथ शांताराम आव्हाड रा. शिर्डी, मुळ संभाजीनगर, ओम बालाजी खरात रा. जि. जालना, हल्ली रा. कांचनवाडी, संभाजीनगर, राहुल साधाकिसन कोकाटे रा. जि. संभाजीनगर, मुळ रा. जि. जालना, साईराज गणेश शहाणे रा. जि. अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

कोपरगाव तालुका परिसरात समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मारहाण करून लुटणारी टोळी ही जालना येथे असल्याची पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, रोहित येमुल, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांच्या पोलिस पथकाने केली आहे. या प्रकरणात अधिक तपास अहिल्यानगर पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment