नवी दिल्ली – सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. सततच्या वाढत्या महागाईने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, मुलाबाळांना शिक्षण कसे द्यावे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. 14.2 किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर 29 रूपयांनी वाढले आहेत. काल मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे.
शनिवारी मध्यरात्री घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. नवीन दर मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी प्रति सिलेंडर 60 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती.
सामान्यतः सरकारी तेल कंपन्या महिन्याच्या 1 किंवा 15 तारखेला एलपीजी सिलेंडरच्या दरात सुधारणा करतात. पण यावेळी मध्यरात्री केलेल्या अचानक घोषणेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. अलीकडे या कंपन्या 7 तारखेलाही सिलेंडरच्या दरात बदल करत आहेत. 7 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 1 जून रोजी, 19-किलोग्राम व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 42 रुपयांची वाढ करण्यात आली. याशिवाय, लहान व्यवसाय आणि नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या 5-किलोग्राम एफटीएल सिलिंडरच्या दरातही 11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता घरगुती वापरल्या जाणार्या 14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 29 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.
सतत वाढणाऱ्या किमतींमुळे गृहिणींमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांचे म्हणणे आहे कि स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. अनेकांचे म्हणणे आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींसोबतच स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढलेल्या किमतींमुळे त्यांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






