विशाखापट्टण – स्टील प्रकल्पात काम सुरू असताना वितळलेले स्टील अंगावर पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे. स्टील प्रकल्पात काम सुरू असताना मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर विशिष्ट प्रकारच्या भांड्यातले वितळलेले स्टील कामगारांच्या अंगावर उडाले.
या दुर्घटनेत कामगारांचा मृत्यू झाला. प्रकल्पातील इतर कर्मचाऱ्यांनी धावपळ केली. आणि आग नियंत्रणात आणली. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी विशाखापट्टणमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आणि पोलिस आयुक्तांशी फोनवरून संपर्क केला आहे. आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी घटनेची माहिती घेतली आणि मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
वितळलेले स्टील अंगावर पडून जखमी झालेल्या कामगारांना आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून द्या असे आदेश आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत. स्टील प्रकल्पातील दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्याविषयी आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. स्टील प्रकल्पातील दुर्घटनेविषयी केंद्रसरकारकडून मृतांच्या वारसांना दोन 2 लाखांची तर जखमींना उपचारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
आंध्र प्रदेशच्या स्टील प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी होणार आहे. स्फोट नेमका का झाला? हे जाणून घेतले जाईल. दुर्घटनेत ठार झालेले कर्मचारी कंत्राटी होते की, कंपनीत कार्यरत होते हे अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी अजूनही मदतकार्य सुरू आहे. या घटनेत अधिक तपास पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






