गोधनी गॅस दूर्घटनेत बाधीत झालेल्यांवर तातडीने उपचार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची तत्काळ धाव; उपचारात कोणतीही कमतरता पडू देऊ नका – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

SHARE:

नागपूर : गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुध्दीकरण केंद्रामध्ये क्लोरीन गॅसची अचानक गळती झाल्याने या परिसरातील निवासी भागात असलेल्या नागरिकांना त्रास जाणवला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने सर्व यंत्रणांना सतर्क करुन एनडीआरएफचे पथक रवाना केले. या पथकातील चमूने तत्काळ बचाव कार्य व तांत्रीक उपाय योजना हाती घेतल्याने संभाव्य धोका टाळण्यात यश मिळविले. एनडीआरएफची टीम, वैद्यकीय पथक व जिल्हाधिकारी यांच्या प्रत्यक्ष समन्वयाने त्रास सुरु झालेल्या नागरिकांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.

मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी घेतला आढावा –

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना तत्काळ सूचना देऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. याचबरोबर आवश्यकता भासेल त्याप्रमाणे आरोग्य विभागाच्या इतर यंत्रणेलाही सतर्क करुन ठेवले होते. गळती होत असलेल्या सिलेंडरला पुर्णत: पाण्यामध्ये बुडवून ठेवण्यात आले व धोका नियंत्रीत करण्यात आला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहित –

दिनांक २४ ऑगस्टच्या पहाटे गोधनी जलशुध्दीकरण केंद्रामध्ये असलेल्या क्लोरीन गॅसच्या दोन सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून गॅसची गळती झाल्याचे निदर्शनास आले. आरोग्य संचालनालय, औद्योगिक सुरक्षा, एनडीआरएफचे पथक यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय साधून या दूर्घटनेवर संभाव्य धोक्यापासून बचाव केला. या गॅस गळतीमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार एकूण ५६ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ११ व्यक्तींना उपचार करुन सुखरुप घरीही पोहचविण्यात आले आहे. सद्यस्थितीत ४५ व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी ८ व्यक्ती आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जावून तपासणी व निरीक्षणे नोंदविण्यात आली आहे.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर.)

 

Leave a Comment