परमेश्वराची भक्ती सर्वच करतात. भक्ती करण्यासाठी देखील दोन साधने आहेत. त्यावरून त्याचे प्रकार पडतात. एक म्हणजे बहिरंग साधने आणि दुसरे म्हणजे अंतरंग साधने. बहिरंग साधने सुलभ आहेत. ती साधने म्हणजे श्रवण, मनन, पठण इ..
ह्या सुलभ साधनांच्या सहाय्याने ईश्वराची भक्ती करता येते. ह्या साधनामुळे साधकाच्या मनात ईश्वर दर्शनाची किंवा ईश्वरी कृपेची इच्छा जागृत होऊ शकते.
दुसरा प्रकार अंतरंग साधना होय. हा प्रकार कठीण आहे. या प्रकारात ईश्वरी दर्शनाची, साक्षात्काराची तीव्र इच्छा साधकाच्या मनात निर्माण होते. “याची देही, याची डोळा” तो प्राप्त व्हावा म्हणून एकांतात केलेली गुह्य साधना म्हणजे अंतरंग साधना होय. यामध्ये योगाभ्यास, ध्यान, चिंतन, नामस्मरण या साधनांना फार महत्व आहे.
भक्तीच्या प्रांतात प्रवेश करू इच्छिणाऱ्या भक्तासाठी, जिज्ञासू साठी अथवा मुमुक्षु साठी “भक्ती पंथ बहु सोपा” असे उद्गार काढले आहे. ज्यांनी भक्ती पंथाची प्राथमिक पायरी ओलांडली आहे त्या श्रेष्ठ साधकांसाठी “भक्ती हे कठीण सुळावरील पोळी” असे सांगून सावधगिरीचा इशारा देखील दिलेला आहे.
नामस्मरण, संकीर्तन, श्रवण इ. साधनांनी थोडीफार चित्तशुद्धी होउन भक्तीमार्गाच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकण्यासाठींगी सामर्थ्य येत असावे. हे प्रवेशद्वार ओलांडल्यावर आणि आत शिरल्यावर ही प्राथमिक साधने हाताळावी लागतातच. त्याशिवाय आपापल्या गुरूंनी सांगितलेले मार्ग आणि साधने अनुसरावी लागतातच. द्न्यानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामादी संतांच्या, वांगमयात असे दाखले मिळतात. वाचन, पठण, स्मरण, कीर्तन इत्यादी साधनांमुळे भक्तीला पाहिजे असलेला आवश्यक भाव निर्माण होतो. हरिपाठातून न्यानेश्वरं म्हणतात, “भावेवीण भक्ती बोलू नये.” संत एकनाथ सुद्धा स्मरण, श्रवण, कीर्तन इत्यादी भक्तीचीच साधने आहेत असे सांगून “भाव तोची देव” हा त्यांचा आवडता सिद्धांत सांगतात. कोणतेही साधन वापरा पण सर्व साधने भावपूर्वक करा असे प्रत्येक संत सांगतात. संत एकनाथ सांगतात, “कळवळा, तळमळ, उल्हास व आत्मार्पण जिथे आहे, त्याचे नाव भक्ती.”
भाव उत्पन्न होणे ही गोष्ट सोपी नाही. संत तुकाराम महाराजानी आपल्या अनेक अभंगातून उच्च कोटीच्या भक्तीभावाबद्दल सांगितले आहे.
“भावाचे कारण, मोक्षाचे साधन..”
“भाव तैसा फळ, भाव दावी शुद्घ..”
“भाव देवाचे उचित, भावनेच्या मुळे..”
“भावबळें विष्णुदास l नाही नाश पावत ll”
“भावाचिया बळे, आम्ही निर्बल दुबळे”,
“भावापुढे बळ, न चले कोणाचे सबळ”,
“भावबळे कैसा झालासी लहान.”
अशा कितीतरी अभंगातून तुकाराम भक्तीभावाबद्दल सांगून जातात. म्हणून भक्ती ही शुद्ध व पूज्यभावा सहीत करावी. भावा वाचून भक्ती म्हणजे अर्थशून्य प्रयत्न आहेत. निष्फळ कवायत आहे. बहिरंग साधनांमुळे, भावशुद्धी होण्यास मोलाची मदत होते.
भावशुद्धी, चित्तशुद्धी झाल्यानंतर साक्षात परमेश्वराच्या मूर्तीचा साक्षात्कार होण्याची ओढ साधकाला लागते. ही साधना कठीण असते. तुकारामाला हीच ओढ लागली होती.
“जीवना वेगळी मासोळी l
तैसा तुका तळमळी ll”
ह्या तुकारामांच्या उद्गारातून त्यांना परमेश्वर भेटीची आस लागली होती हे लक्षात येते. त्यासाठी त्यांनी आपले सर्व षडविकार मारले होते. काम क्रोध, लोभ, माया, द्वेष अहंकार या षड्रीपुंवर मात केली. या अवस्थेला उद्देशून तुकारामांनी “संसारा आगी l आपुलेनी हाते l”
“जाळोनी संसार बैसलों अंगणी”
“तुका म्हणे जो संसारा रुसला ल
तेणेची ठाकला सिद्धपंथ ll”
“झाला प्रेतरूप शरीराचा भाव”
असे उद्गार काढले आहेत.
संत तुकारामांनी भक्तीसाठी नामस्मरण हाच मार्ग चोखाळला. ह्या सोप्या साधनाच्या उत्तरोत्तर चढत्या अवस्था आहेत.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
संत साहित्यिक तथा कवी, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.





