काल परवाचीच गोष्ट असावी. पाहुणे निघून गेल्यावर पसंती झाल्यावर वहिनी माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकून म्हणाली, “खरी पसंती तर पुण्यालाच झाली, ही तर औपचारिकता आहे.” हे मात्र खरं होतं, एकाच कंपनीत कामाला असल्याने अनघा बरोबर माझी पूर्विचीच ओळख होती आणि ओळखीतून मैत्री आणि नंतर पसंती झाली, त्याचीच परिणीती आज रितसर लग्नाची बोलणी करिता झाली. ते काहीही असो, वहिनीच्या कोपरखळीने मी मात्र थोडाफार ओशाळलो पण इतर मात्र खळखळून हसलीत. कोपरखळी ही अशीच असते, हसते आणि हसविते. लहानपणी एकदा शालेय अभ्यासक्रमात हा शब्द आला असतांना सरांनी बरीचशीच उदाहरणं देत कोपरखळी बाबत सांगितले होते पण मला त्या वेळी तेवढं काही चांगलं समजलं नव्हतं. समोरच्या रोझीच्या गालावरील असलेल्या खळी सारखी ही सुध्दा कोपरावर पडणारी खळी असावी असं वाटतं असायचे पण रोझीच्याच काय इतर कुणाच्याही कोपरावर ती आढळून न आल्याने शेवटी मी त्याचा पिच्छा सोडला. थोडं मोठं झाल्यावर आपसूकच कळलं की कोपरखळी म्हणजे एखाद्याला बोलतांना, त्याचा मनाला न लागेल असं कमी शब्दात विनोदी बोलणं, अर्थातच या करिता तशा आशयाची प्रसंगी निर्मिती हवी कारण कोपरखळीला संदर्भ आणि प्रसंगावधान हे दोन्हीही हवे असते. नेमके, प्रभावशाली, प्रसंगाला अनुरूप, शैलीदार बोचरे शब्द हे कोपरखळीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. धारदार शब्द गतिमान अस्त्र कोण्या एकावर जरी बरसत असले तरी या शस्त्राचा प्रभाव मात्र सर्वत्र दिसून येतो आणि ठहाका पसरतो. मात्र कोपरखळी नावाचं क्षेपणास्त्र उठसूठ फेकता येत नाही, तसेच ठरवून प्रयोग करता येत नाही. तो एक संयोग असतो. हजरजबाबी व्यक्तीमत्वांना या मध्ये कौशल्य हासील असतो. म्हणी, वाक्प्रचार, इतर भाषेतील अर्थपूर्ण शब्द संग्रह, शारीरिक हालचाली आणि संवादफेकीतील हेलकावे आणि कंगोरे या गुणांमुळे ही कला विकसित होते. नातेसंबंधात ही कोपरखळी आवर्जून उपस्थित राहाते पण अतिरेक झाल्यास अंगावर बेतले ही जाऊ शकते असं आवर्जून सांगावेसे वाटते. सर्वांनाच ही कला साध्य होत नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ही एक दुर्मिळ, जन्मतः प्राप्त होणारी कला असून मन:पूर्वक चिकाटीने अभ्यास करुन शिकल्यास काही प्रमाणात आत्मसात करता येवू शकते.
कोपरखळीचं एक विकृत रूप म्हणजे सासूबाईंनी सुनेला वेळी अवेळी सतत मारलेले शाब्दिक फटकारे. म्हणजेच लेकी बोले सुने लागे, या माध्यमातून केलेली सुनबाईची प्रतारणा. पूर्वी हा प्रकार अतिशय प्रचलित होता पण विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे, काही अपवाद वगळल्यास, हल्ली मात्र दिसून येत नाही. कालाय तस्मै नमः दुसरं काय. पण एक मात्र खरं, कारुण्याची झालर असलेला हा एक अस्सल्ल विनोदी प्रकार म्हणून गणला जाईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सासू व सून यांच्या धुसफुसी मधून ही पुतना मावशी प्रकट होते आणि सुखी संसारात बिब्बा कालविते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त सासुबाईंना संवाद असतात. सुनेला मात्र ते निमूटपणे सहन करावयाचे असतात. सासुरवास हा शब्द या मावशीची पाठराखण करीत असतो. सासुरवास असलेल्या सुना, पाणवठ्यावर आपसात भेटल्यावर एकमेकांच सांत्वन करुन दुःख हलकं करायच्या. पण आता पाणवठा जाऊन घरोघरी नळाचे पाण्याची सोय झालेली आहे, त्यामुळे दुःख हलके करायचे तरी कसे, हा यक्षप्रश्न प्रताडीत सुनांना नक्कीच पडला असावा पण पुणेकरांनी नळ स्टॉप उभा करुन थोडीफार कां होईना या प्रश्नांची सोडवणूक केल्याचे दिसून येते. सर्वांनाच पुण्याची वारी करणं शक्य होतं नाही. सासूबाई सुध्दा आता बर्याच मवाळ झालेल्या आहे. असलं काही करून नसलं ते अरिष्ट विकत घ्यायला त्या आता धजावत नाहीत. त्यामुळे ही प्रथा जवळपास मोडीतच निघालेली आहे. तसेच स्री मुक्तीचे वारं वाहावयास लागल्याने, असले प्रकार सुना सुध्दा सहन करुन घेतांना दिसत नाही. फेकलेल्या गुगली वर चौकार बसू शकतो, हे सासूबाईंना उमजल्या मुळे त्या सुध्दा सामंजस्याचे धोरण स्विकारतांना दिसतात. त्यामुळे हे असलं जुनं पण नात्यांमधील विचित्र संभाषण आज अडगळीत पडलेल दिसते. अपवादात्मक परिस्थितीत क्वचितच कुठेतरी आढळून येत असते. पण चर्चेचा विषय होऊन चौफेर टिका होत असल्याने ते पूर्णत्वास जात नाही. तरीसुद्धा हा विनोदी आणि अभिनय संपन्न असलेला हा ऐतिहासिक प्रकार आजही सर्वश्रुत आणि परिचित आहे.
कोपरखळीचा आणखी एक खतरनाक प्रकार म्हणजे टोमणे मारणं. कोपरखळी हळूहळू कुरवाळत गुदगुल्या करणारी तर टोमणा मात्र खळखळून हसविणारा. प्रसंगी टोमण्यामुळे एखाद्या हळव्या व्यक्तिचे मन खट्टू सुद्धा होऊ शकते. “भाजी चांगली झाली, मिठ कमी असतं तर आणखी चांगली झाली असती,” असा पत्नीला आडवळणाने मारलेला टोमणा सुसंस्कृत पठडीतला, पण सरळ प्रहार करून मारलेले टोमणेही घराघरात दिसून येतात. पूर्वी घरातील लहान मंडळींना सर्व बाबतीत झुकते माप मिळत असायचे. मग ते खाऊ म्हणून की आणखी काही म्हणून, अशा वेळी त्यांना इतर भावंडांनी मारलेले टोमणे सहन करावे लागत असायचे. लहानपणाची ही आगळीच गंमत पण आता मात्र एक कुटुंब एक अपत्य या प्रथेमुळे लहान कोणं आणि मोठं कोणं, असला फरकच संपुष्टात आलेला आहे. भावंडांमध्ये हरविलेलं लहाणपण आज फक्त पुस्तकांत दिसून येते आणि वाचण्याची तसदी सुध्दा कुणी घेतांना दिसत नाही, मोबाईलचा प्रताप दुसरं काय. पूर्वी मॅट्रिकला साठ टक्के मार्क मिळवून, फर्स्ट क्लास जरी मिळाला तरी, “हुशार आहे हो, काॅपी साधली वाटते,” असे मित्रांकडून टोमणे मिळायचे पण हल्ली सर्वानाच नव्वद टक्क्यांचे वर मार्क्स मिळत असल्याने, असले टोमणे नामशेष झालेले आहेत तरि सुध्दा काही खोचक टोमणे आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. मित्रमंडळी मध्ये काॅलेज कट्ट्यावरील टोमणे अगदी संग्रही ठेवण्यासारखाच असतो. विषय सुध्दा भरपूर असतात. एखाद्याची हुशारी, लकब, आवड निवड, सवय, पेहराव, गुपीत, परिक्षा, होम वर्क अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. एकदा मी काॅलेजला नवीन फॅशनेबल शर्ट घालून गेलो असता मित्रमंडळी शर्टाची चांगला आकर्षक दिसत आहे म्हणून स्तुती करायला लागली. तेवढ्यात एकानं शर्ट खरोखरच छान आहे, कुणाचा आहे, असा टोमणा मारत माझा विरस केलेला होता. ते काहीही असो शाळा कॉलेज मध्ये मिळालेले टोमणे पुढील काळात हवेहवेसे वाटणारे व आठवणी ताज्या करणारे असतात, हे मात्र तेवढंच खरं.
कोपरखळी म्हणजे एक प्रकारचा प्रासंगिक विनोद. असे विनोद जर इरसाल झाले तर त्याचे रुपांतर उडवाउडवी मध्ये होते. कोपरखळीचे हे उडाणटप्पू भावंड. ग्रामीण भागात पारावर निवांत बसून गप्पा छाटणार्या टोळक्यात ही उडवाउडवी तंबाखू भरलेल्या पेटत्या चिलीम सारखी ईकडे तिकडे फिरत असते. एखादा रस्त्यावर दिसणारा वाटसरू, कडीचा डबा घेऊन गावाबाहेर पोट धरुन चाललेला इसम, कटिंग दाढी करून आलेली व्यक्ती, तालुक्याचे गावाला जाणारी मंडळी अशी रस्त्यावरील कुणीही यांना चालत असते, कारण रस्त्यावरच एखाद्याची वरात काढणं, हेच यांना ठावूक असते. उडवाउडवी केल्यावर सामुहिक रित्या कुत्सितपणे हसणं हे तर अशांचं खास सेलेब्रेशन असते. सहसा गरीब, पापभिरू, निष्पाप, गरजवंत आणि विवंचनेत असलेले लोक अशा टोळक्याचे लक्ष असते. वजनदार किंवा वरचढ आणि त्वरित प्रति उत्तर देणारे मात्र यांना व्यर्ज असतात. पण एक मात्र खरे, असे उडवाउडवी करणारे महाभाग संभाषणात अव्वल असतात. कोणत्याही विषयाचे जरुरी पेक्षा जास्त ज्ञान अशांना कसे काय प्राप्त असते हा सुध्दा एक गहन प्रश्न असतो. आणखी म्हणजे परिसरातील चांगल्या वाईट घटनेची माहिती या महाभागांना खडा न खडा असते. उखाळे पाखाळे काढण्यात हे लोक तरबेज असतात. इतकेच काय यांच्या सवयीमुळे बरेचदा स्वतःला प्रतिष्ठीत म्हणून समजणारे हे लोक मार सुध्दा खातात. पण लवकरच आपण त्या गावचेच नाही असा निर्विकार चेहरा करित परत यांचा नसला तो उद्योग चालू होतो. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तसलाच हा प्रकार. दुसरं काय. शहाण्यांनी मात्र या असल्या नसत्या फंदात न पडलेलंच बरं.
कोपरखळी आणि थट्टामस्करी हे दोन्ही एकाच जातकुळीतील पण दोघंही एकमेकांच्या अगदी भिन्न आहे. कोपरखळी क्षणिक असते म्हणजे एकदा केल्यास लवकरच तो विषय बंद होतो कारण दुसरा यावर प्रतिक्रिया विनोद साधून प्रतिक्रिया देईलच असे नाही. कोपरखळी वरील प्रतिसाद म्हणजे खळखळून हसणं, लाजून खाली बघणं, डोळे वटारून बघणं अशाप्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करणं. पणं थट्टामस्करी एकदा सुरू झाल्यावर कधी संपणार याची खात्री नसते. सहसा समुहात असले प्रकार दिसून येतात. स्नेहसंमेलन, सहल, मेळावा या ठिकाणी तर याची रेलचेलच असते. सर्व एकमेकांना परिचित असल्याने कुणीही या मध्ये किंचितही नाराज होत नाही उलट केलेली थट्टामस्करी वेळ घालविण्याचे एक साधन असते. थट्टामस्करी चालू असतांनाच हसण्याचे विविध प्रकार पहावयास मिळतात. खो खो करून हसणं, सातमजली हसणं, दात विचकून हसणं, गालातल्या गालात हसणं, मनातल्या मनात हसणं असे हसण्याचे विविधांगी प्रकार या ठिकाणी सांगता येतील. थट्टामस्करीला विषय कोणताही असो, एकदा सुरू झाल्यावर मग विषयातून विषय बाहेर येतात आणि थट्टामस्करी फुलते आणि फलते. थोडक्यात काय तर थट्टामस्करी म्हणजे मित्रमंडळीचे नातं दृढ करणारे एक वेगळंच रसायन असल्याचे दिसून येते.
कोटी करणे हा प्रकार सुध्दा याच पठडीतला आहे. एखाद्या बोललेल्या वाक्यावर त्वरीत दुसरे अर्थपूर्ण विरोधाभास असलेले विनोदी वाक्य सादर करणे म्हणजे कोटी करणे, असे ढोबळमानाने म्हणता येईल. एकदा मित्राला मी बारा वाजताच्या गाडीने निघू या, असे म्हटल्यावर एकानं, तिथे काय बारा वाजवायला जायचं कां, लवकर निघूया, अश्या प्रकारे कोटी केली. कोटी ही क्षणात गंमत करुन हसविणारी कोपरखळीची धाकटी बहीण म्हणून शोभून दिसते. आवडणाऱ्या व्यक्तीच्या शब्दावर कोटी ही आपसूकच प्रकट होत असावी, कारण अनोळखी व अपरिचित व्यक्तीशी संवाद साधताना कोटी मात्र अनवधानानेही समोर येत नाही. भाषेवर प्रभुत्व आणि विनोदबुद्धी असलेली मंडळी अशी प्रसंगानुसार कोटी करण्यासाठी निष्णात असतात. अशा महाभागांच्या कृपेमुळे कोपरखळीची ही अवखळ बहिण संभाषणातून अजूनही अस्तित्व टिकवून आहे, हे मात्र महत्त्वाचे. या परिवारातील सर्वात लहान आणि लाडकं भावंड म्हणजे, चुटकुले. याच्या बाळबोध लिला अगाध आणि अथांग आहे. सर्वांनाच यांचा लळा लागलेला असतो. लहानग्यांना सहज समजेल असे संवाद म्हणजे चुटकूला म्हणता येईल पण मोठ्यांनाही हा प्रकार चांगलाच भावतो. एकदा मला सकाळी उठायला उशीर झाल्याने काहीतरी कारण सांगायचं म्हणून छोट्या मुलीला म्हणालो,” अग, ढगाळ वातावरण व अंधारून आल्यामुळे मला सकाळ झाली तरी सूर्य दिसलाच नाही, त्यामुळे उठायला उशीर झाला.” हे ऐकताच भाबडी म्हणते कशी,” मग टार्च घेऊन सूर्य का बघितला नाही, समजलं असतं सकाळ झाली म्हणून.” हे ऐकून मी तर चाटच पडलो. अनवधानाने लहान मुलं असलं काही बोलून जातात की त्यामधून फार मोठा विनोद निर्माण होतो. मोठ्यांनाही अशा पध्दतीने विनोद साधणं जाणून बुजून ही शक्य होत नाही.
कोपरखळीच आणखी एक सुसंस्कृत भावंडं आहे ते म्हणजे गंमत. हे शाब्दिक तर असते पण बरेचदा प्रासंगिक सुध्दा असते. आजोबा आणि नातवंडे यांच्या गमतीजमती या सर्वश्रुत आहेत. नक्कल करणे हा सुध्दा यांमध्ये एक प्रकार आहे. लहान मुले अनुकरण प्रिय असतात. आजीची चालण्याची गंमत, आजोबांची काठी धरण्याची गंमत, निरनिराळ्या व्यावसायिकांच्या गमती जमती लहान मुले करतांना नेहमीच दिसतात. चष्मा लावून पेपर वाचणं असो की स्वयंपाक करतांना पोळ्या लाटणं, अशा गमती लहानग्यांना चांगल्याच भावतात. पशुपक्षी यांचे निरनिराळे आवाज काढणे, शिक्षकांचे शिकविणे, चित्रपटातील कलाकाराची नक्कल करणे असे प्रकार लहानपणी सर्वांनीच केलेले आहे. एक सर्वप्रचूर नेहमीची गंमत म्हणजे मोठ्यांच्या चपला पायात घालून चालणे किंवा उलटी चप्पल घालून चालणे, अशा या गमती मधूनच तर लहान मुले शिकतात आणि केव्हा मोठी होतात कळतंच नाही.
विनोद नावाचं सदाबहार व्यक्तीमत्व सुध्दा याच परिवारात नांदते. हे सर्वात प्रचलित आणि सर्वदूर म्हणजे जळी स्थळी काष्टी आणि पाषाणी आढळून येणारं सर्वसमावेशक भावंड आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. याची व्याप्ती विशाल आहे कारण विनोद बुध्दी ही कमी जास्त प्रमाणात सर्वांचे ठायी वसलेली असते. एकदा मिसेस नी मला दुध आजकाल थोडं जास्तच पातळ येत आहे, घट्ट साय धरत नाही, दुधवाल्याला थोडं म्हणून बघा, असं सांगितलं. मी तसं म्हणून पाहिलं पण दुध वाल्याचा चेहरा बिल्कुल निर्विकार होता, कदाचित त्याला माझं म्हणणं अपेक्षित असावे किंबहूना असलं ऐकणं त्यांचे अंगवळणी पडलेलं असावं. तो गांभीर्याने म्हणाला, “साहेब, हवामाना नुसार सारंच काही बदलतं. कधी नरम तर कधी गरम हा तर सृष्टीचा नियमच आहे. उन वारा पावसाचा प्रभाव पशुपक्षांवर सुध्दा पडतो, त्यांचा सुध्दा मुड असतो, त्यामुळे दुध थोडं पातळ येत असावं. आणि हो काय सांगावं, आमच्या ग्रामीण भागात पिण्याचे पाण्यासाठीच तर दाही दिशा भटकावं लागतं. बाकी आपणं सुज्ञ आहातच. दोन दिवस वाट बघा, तक्रारीची वेळ येणार नाही.” पातळ दुधाबद्दल एवढं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकुन मी तर चाटच पडलो. मला समजलं होतं पण आता माझी पाळी होती. मिसेसला कसं समजावून सांगावं, असा जटील प्रश्न मला पडलेला होता. दुध वाल्याने गांभीर्याने विनोदाचा आधार घेत प्रश्नाला चांगलीच बगल दिलेली होती. तर विनोद हा असा असतो, कधी कधी न सुटणारी कोडी याचे माध्यमातून सोडविता येतात. विनोदाचे प्रामुख्याने प्रसंगनिष्ठ, शब्दनिष्ठ आणि व्यक्तीनिष्ठ असे प्रकार सांगीतले जातात. या मध्ये आणखी उपप्रकार देखील आहे. केळीचे सालावरुन घसरून पडतांना एखाद्याला बघितले कुणालाही हसू येतं, एवढंच काय सावरल्यावर पडणारा देखील हसायला लागतो. प्रसंगनिष्ठ विनोदाचे हे नेहमीचं उदाहरण म्हणून सांगता येईल. तर विनोद हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर तो एक विनोद न ठरता वस्तुस्थिती ठरली जाईल. शेवटी कोपरखळी आणि तिच्या भावंडांनी आपल्या सर्वांच जीवन जगणं सुसह्य, सफल आणि आनंदी केलेलं आहे, हे निर्विवाद सत्य आहे, या विषयी दुमत नसावे.
लेखक –
अभि. प्रफुल्ल ठाकरे, अमरावती.
संपर्क – ९४२०२३८०२१
Author: अभि. प्रफुल्ल ठाकरे
लेखक अमरावती येथील रहिवासी असून अभियंता म्हणून सेवानिवृत्त आहे. सोबतच त्यांनी एम. ए. मराठी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केलेले आहे. वाचणाची व लिहीण्याची आवड त्यांनी जोपासली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक कथा, कविता, लेख लिहीलेले आहे. सर्वच विषयावर ते प्रभावी व मनभावन लेखन करतात. अनेक दिवाळी अंक व मासिकातून त्यांचे लेखन प्रसिध्द झालेले आहे, तसेच वृत्तपत्रातून सातत्यपूर्ण त्यांचे कथा कविता लेख इत्यादी साहित्य प्रसिद्ध होत असतात. सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात..






