गडचिरोली : नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्रभावीपणे आणि वेळेत मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ आज शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी अभियानाच्या जनजागृती वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोळकर, सहायक प्रकल्प अधिकारी वाहिद शेख, सहायक प्रकल्प अधिकारी देविदास टिंगुसले, मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले की, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पुढील एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या महत्त्वाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. आदिवासी विकास, महसूल, ग्रामविकास, क्रीडा, सांस्कृतिक, ऊर्जा यासह विविध विभागांनी आपापल्या विभागाशी संबंधित महत्त्वाच्या सेवा व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.

वनहक्कधारकांच्या अभिलेख अद्ययावतीकरणाला गती
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या अभियानात काही महत्त्वपूर्ण मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी सांगितले. वनहक्क पट्टे प्राप्त लाभार्थ्यांच्या महसूल अभिलेखांतील आवश्यक नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया अभियान कालावधीत युद्धपातळीवर राबविण्यात येईल. वनहक्क पट्टा आणि महसूल अभिलेखातील क्षेत्रामध्ये तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी महसूल विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ, नुकसानभरपाई तसेच अन्य पात्र सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली.)
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






