रोहणीचे राम-शाम — बंधुत्व, त्याग आणि प्रेमाची अमर कहाणी

SHARE:

व्यक्ति आणि वल्ली या सदराखाली…

काही नाती रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन मनावर कायमची कोरली जातात. काही माणसे आपल्या आयुष्यात फार मोठी भूमिका बजावत नाहीत; पण त्यांच्या साधेपणातून, वागण्यातून आणि नात्यांमधून आपल्याला आयुष्यभर पुरेल असा संस्कार मिळतो. रोहणी गावातील श्री. शामराव मानकर आणि त्यांचे धाकटे बंधू श्री. रामराव मानकर ही अशीच दोन माणसे होती. त्यांच्या बंधुत्वाची आठवण आजही मनाला स्पर्शून जाते. राम शाम यांची जोडी.

माझे बालपण प्रामुख्याने रोहणी येथेच गेले. वर्धा नदीच्या काठी वसलेले, निसर्गसौंदर्याने नटलेले आणि साधारण पाचशे ते सातशे लोकवस्तीचे ते छोटेसे गाव होते. त्या काळातील गाव म्हणजे खऱ्या अर्थाने गाव होते. गावात उच्च प्राथमिक शाळा, पोस्ट ऑफिस आणि ग्रामपंचायत होती; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे गावकऱ्यांमध्ये आपलेपणा, बंधुभाव आणि सुख-दुःखात एकमेकांना साथ देण्याची भावना होती.

माझ्या वडिलांची नोकरी रोहणी येथे असल्यामुळे आमचे बालपण या गावातच गेले. त्या काळात गावातील सामाजिक आणि राजकीय वातावरणही सलोख्याचे होते. तसेच राजकीय आणि सामाजिक जीवनात काम आणि नेतृत्व या गावाने देशपातळीवर दिले होते. मतभेद असतील, विचार वेगळे असतील; पण मनभेद नव्हते. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असत.

याच रोहणीच्या आठवणींमध्ये एक नाव आजही अगदी जिवंत आहे—श्री. शामराव आणि श्री. रामराव मानकर.

शामराव म्हणजे आमचे ‘शाम’. ते पोस्टमन म्हणून काम करीत. आमच्या घराजवळच्या पिंपळाच्या झाडाला पोस्टचा लाल डबा टांगलेला होता. त्यामुळे सकाळची त्यांची फेरी आमच्या घराजवळून ठरलेलीच असे. पोस्टचे काम आटोपून ते आवर्जून आमच्या घरी येत. बाबांशी गप्पा मारत, चहा-कॉफी घेत आणि मग गावातील, घरातील किंवा बाहेरील अनेक गोष्टींची चर्चा होत असे. बाबांना ते मनापासून मानत. त्यांच्या स्वभावात एक निरागस उत्साह होता. नवीन सायकल घेतली, घड्याळ घेतले किंवा काही नवीन वस्तू खरेदी केली की ती बाबांना आवर्जून दाखवत. चित्रपटांचीही त्यांना विशेष आवड होती. विशेषतः दादा कोंडके यांचे चित्रपट त्यांना खूप आवडत. वर्ध्याहून बाबांकडून चित्रपटाची गाणी अलेली पुस्तके बोलवून घेण्याचेही प्रसंग आठवतात.

एक आठवण तर आजही अगदी डोळ्यासमोर उभी राहते.
कोटेश्वर येथील महाशिवरात्रीची जत्रा. शामरावांनी आम्हाला खूप आग्रह करून सोबत नेले आणि तेथे ‘बोट लावीन तेथे  गुदगुल्या’ हा चित्रपट टुरिंग टॉकीज मध्ये आम्ही पहिला. लहानपणीच्या त्या छोट्याशा आनंदाचे मोल आजच्या मोठ्या सुखांपेक्षा कधी कधी अधिक वाटते. पण शामरावांची खरी ओळख केवळ आमच्याशी असलेल्या जिव्हाळ्यामुळे नव्हती. त्यांच्या जीवनाची खरी कहाणी त्यांच्या धाकट्या भावाच्या सेवेत दडलेली होती. त्यांचे धाकटे बंधू श्री. रामराव मानकर स्वभावाने अत्यंत शांत, अबोल आणि कमी मिसळणारे होते. स्वतःचे घर आणि स्वतःचे जग यातच त्यांचे आयुष्य रमलेले होते. आम्ही त्यांच्या घरासमोरून जात असू तेव्हा ते घर बाहेरून काहीसे बंदिस्त आणि गंभीर वाटायचे. रामरावांना क्षयरोगाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि दैनंदिन जीवनाची काळजी घेण्याची जबाबदारी मोठ्या भावाच्या मनावर होती.

आणि इथेच शामरावांच्या व्यक्तिमत्त्वातील खरा मोठेपणा दिसतो.
धाकट्या भावाची सेवा कमी पडू नये, त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, त्याला एकटेपणा जाणवू नये—या भावनेतून शामरावांनी स्वतः लग्न न करण्याचा निर्णय घेतला. दोन भावांचा संसार म्हणजे दोन स्वतंत्र संसार नव्हते; तो जणू एकाच प्रेमाने जोडलेला संसार होता.रामरावांची काळजी घेणे, त्यांच्यासोबत राहणे  स्वयंपाक करून जेवू घालणं आणि त्यांच्या इतर गरजा पूर्ण करणे हेच शामरावांचे आयुष्य बनले. हा त्याग मोठमोठ्या शब्दांत सांगण्याची गोष्ट नाही; तो त्यांच्या जगण्यात दिसत होता. दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. तुळशीविवाहाच्या वेळी पौरोहित्याचे काम आवडीने करीत. दिवाळीच्या सणाला किंवा इतरही सणाचे निमित्याने आमच्या कडे या दोघा भावंडांना जेवण करिता किंवा  फराळा करिता आम्ही  बोलवत असत..
एक प्रसंग मला विशेष आठवतो. ते स्वतःच्या वस्तूंना फारसा हात लावू देत नसत. पण एकदा मला विजयगोपाल येथे काही खरेदी करायची होती. तेव्हा शामरावांनी मला त्यांची सायकल दिली. त्या काळात ती माझ्यासाठी साधी सायकल नव्हती; ती त्यांच्या विश्वासाची आणि आपलेपणाची खूण होती.

काळ पुढे सरकत गेला.
माझ्या बाबांची रोहणीहून दुरुगुडा येथे बदली झाली. आम्ही रोहणीपासून दूर गेलो. पण नाती आणि माणुसकी अंतरामुळे कधी कमी होत नाहीत. कालांतराने वार्धक्याने प्रथम श्री शामराव निवर्तले पण त्यांचा आमच्या प्रति असलेला स्नेहाचा वसा भाऊ रामराव यांनी सुरू ठेवला. विशेषतः रामभाऊंची आठवण मनात राहिली. ते अनेकदा पायी दुरुगुड्याला येऊन माझ्या बाबांना भेटत. एवढ्या साध्या माणसाच्या मनात असलेला हा जिव्हाळा आज आठवला की मन भरून येते. नंतर काळाच्या ओघात रामरावही या जगातून निघून गेले. पण त्यांच्या जाण्याने केवळ दोन माणसे नाही, तर एका काळातील नात्यांची एक सुंदर परंपरा आपल्यापासून दूर गेली. आजच्या काळात भाऊ-भाऊ एकमेकांपासून दूर जाताना दिसतात. संपत्ती, अपेक्षा, गैरसमज आणि स्वार्थ यांमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अशा वेळी रोहणीतील राम-शाम बंधूंचे जीवन आपल्याला काहीतरी वेगळेच शिकवून जाते.

प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत हसणे नाही.
प्रेम म्हणजे गरजेच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे.
प्रेम म्हणजे स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्या माणसाची काळजी घेणे.
प्रेम म्हणजे शब्दांपेक्षा कृतीतून नाते जगणे.
शामरावांनी धाकट्या रामरावांसाठी जे केले, ते कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा, सन्मानापेक्षा आणि प्रसिद्धीपेक्षा मोठे होते. रोहणीच्या मातीने आम्हाला अनेक आठवणी दिल्या; पण राम-शाम बंधूंच्या रूपाने त्याच मातीने आम्हाला बंधुत्वाचा एक सुंदर आदर्श दिला. आज त्यांच्या आठवणींना मनःपूर्वक अभिवादन करताना मन नकळत भरून येते. त्यांच्या साध्या घराची उब, शामरावांचा जिव्हाळा, रामरावांची शांत उपस्थिती आणि त्या दोघांनी जगलेले निःस्वार्थ नाते हे सारे आजही स्मृतींच्या कोपऱ्यात तितकेच जिवंत आहे.

“राम-शाम यांचे बंधुत्वाला सलाम !
त्या निःस्वार्थ प्रेमाला सलाम !
त्या त्यागाला मनःपूर्वक प्रणाम !”

काळ पुढे जाईल, गाव बदलेल, माणसे बदलतील; पण खऱ्या प्रेमाने जगलेली नाती आठवणींच्या रूपाने सदैव जिवंत राहतात. रोहणीच्या मातीत उमललेली राम-शाम बंधूंची ही कहाणीही अशीच मनामनांत जिवंत राहो—आणि प्रत्येकाला नात्यांमध्ये प्रेम, त्याग आणि माणुसकी जपण्याची प्रेरणा देत राहो.

 

लेखक –
इंजि. प्रदीप चौधरी
हेल्थ अँड लाइफ कोच 
H24 FIT CIUB and NUTRI WORLD, नागपूर.
संपर्क – ८६६८४६६४३८

इंजि. प्रदीप चौधरी
Author: इंजि. प्रदीप चौधरी

लेखक नागपूर येथील रहिवासी असून अमरावती येथील कृषिदेव खत कारखान्यात कारखाना व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पेशाने ते यांत्रिकी अभियंता आहे, त्याचबरोबर समाजातील आरोग्य आणि फिटनेस जनजागृतीसाठी ते हेल्थ अँड लाइफ कोच म्हणूनही कार्यरत असून समाजप्रबोधनाचे कार्य सक्रियपणे करतात. साहित्याची आवड असल्यामुळे ते सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य व जीवनशैली विषयक लेखन नियमितपणे करतात. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक विषयांवर विपुल लेखन केले असून त्यांचे लेख सोशल मीडिया मध्ये सातत्याने प्रकाशित होतात. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे पार पाडत आहेत. आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक लेखणीद्वारे ते सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयांवरील महत्त्वपूर्ण विचार जनतेसमोर मांडतात. आपले विचार सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून ते नेहमी प्रखरतेने मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा