नागपूर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा गौरवशाली इतिहास शौर्य आणि स्थापत्य वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक वारशाच्या जपणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ‘खासदार शिव किल्ले स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीच्या पर्वावर होणाऱ्या या स्पर्धेत पर्यावरण पूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून किल्ले साकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गड किल्यांचे अभ्यासक अतुल गुरु यांनी ‘खासदार शिव किल्ले स्पर्धे’ बद्दल संपूर्ण माहिती दिली.
१ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान करा नोंदणी
या स्पर्धेसाठी शालेय व खुला असे दोन गट करण्यात आले आहेत. या दोन्ही गटासाठी शिव किल्ले आणि काल्पनिक किल्ले असे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी इच्छुकांना १ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान नोंदणी करता येणार आहे. केंद्रीय मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कला साहित्य सांस्कृतिक परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच गणेशोत्सव, शारदोत्सव, दुर्गोत्सवामध्ये मंडळांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. याच अनुषंगाने मागील वर्षीपासून किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला त्यामुळे यावर्षी अधिक मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. किल्ला तयार करण्याची इच्छा असलेल्या स्पर्धकांना दोन ते तीन दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. स्पर्धकांनी तयार केलेल्या किल्ल्यांचे १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण केले जाईल पर्यावरण पूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून किल्ले तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी
या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी रु. ५१, ००० /-, द्वितीय क्रमांकासाठी रु. ३१,००० /- तर तृतीय क्रमांकासाठी रु. २१,००० /- चे बक्षीस राहील. पाच प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाणार असून त्यांना प्रत्येकी रु. ५००० ची राशी दिली जाणार आहे.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नावे नोंदणी करिता व अधिक माहिती करिता मा. श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, पहिला माळा, गडकरी वाडा, महाल, नागपूर येथे १ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान सकाळी १२ ते ३ या वेळेस संपर्क साधावा.

(पत्रकार परिषदेला खासदार महोत्सव समिती चे डॉ. गौरीशंकर पाराशर, प्रा. राजेश बागडी, अतुल गुरु व संजय बंसाली उपस्थित होते.)
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, डॉ. दीपक खिरवडकर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश भुसे, संदीप गवई, संजय गडकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ॲड. नितीन तेलगोटे, मनीषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप कौर, शैलेश ढोबळे, संजय बंगाली, अतुल गुरु, योगेश बन, राजू कनाटे यांचे सहकार्य लाभत आहे.
प्रेस क्लब नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेला डॉ. गौरीशंकर पाराशर, प्रा. राजेश बागडी, शिव किल्ले स्पर्धा समितीचे संयोजक अतुल गुरु, संजय बंगाली उपस्थित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






