“ओरडल्याशिवाय ऐकतच नाही!”

SHARE:

“माझं मूल मी ओरडल्याशिवाय ऐकतच नाही!”

हे वाक्य अनेक पालकांच्या तोंडून सहज ऐकायला मिळतं. सकाळची धावपळ असो, शाळेची वेळ असो किंवा संध्याकाळचा खेळ—आई एकदा सांगते, दुसऱ्यांदा सांगते, तिसऱ्यांदा आठवण करून देते आणि शेवटी आवाज चढतो. आणि गंमत म्हणजे, आवाज चढताच मूल हालचाल करतं!
मग पालकांचा निष्कर्ष ठरलेला—“याला सगळं ऐकू येत होतं. फक्त माझं ऐकायचंच नव्हतं!”

पण खरंच असं असतं का?
विशेषतः दोन ते सात वर्षांच्या मुलांकडे पाहिलं तर चित्र थोडं वेगळं दिसतं. या वयात मुलाची लक्ष बदलण्याची, एखादी गोष्ट मध्येच थांबवण्याची, सूचना लक्षात ठेवण्याची आणि त्यानुसार लगेच कृती करण्याची क्षमता अजून विकसित होत असते.

मूल खेळण्यात अगदी तल्लीन आहे. आई म्हणते, “चल, आता बूट घाल.”
आपल्यासाठी ही एक सूचना आहे. पण मुलासाठी त्यामागे अनेक छोट्या पायऱ्या आहेत. आधी त्याचं लक्ष खेळातून आईच्या आवाजाकडे वळायला हवं. मग त्याने सूचना समजून घ्यायला हवी. त्यानंतर आवडता खेळ थांबवण्याची मानसिक तयारी करायला हवी. शरीराने उठून बूट घालण्याच्या कृतीकडे वळायला हवं. म्हणजे लक्ष बदलणे, सूचना समजणे, वर्तमान कृती थांबवणे आणि नवीन कृती सुरू करणे—या सगळ्या प्रक्रिया घडत असतात.

म्हणून या वयात “मी सांगितलं आणि लगेच का नाही केलं?” यापेक्षा “त्याला माझ्या सूचनेकडे वळण्यासाठी किती मदत लागते?” हा प्रश्न पालकांसाठी अधिक उपयोगी ठरतो.
याचा अर्थ मुलाला प्रत्येक वेळी दहा वेळा सांगायचं असं अजिबात नाही. उलट, वारंवार सूचना देत राहून शेवटी ओरडण्याची सवय लागली तर एक वेगळाच पॅटर्न तयार होऊ शकतो.
पहिली शांत सूचना—अजून वेळ आहे.
दुसरी सूचना—अजून थोडा वेळ आहे.
तिसरी सूचना—आई पुन्हा सांगेल.
आणि आई ओरडली—आता खरंच करायचं!
मग पालकांना वाटतं, “माझं मूल ओरडल्याशिवाय ऐकत नाही.” आणि मुलाला नकळत शिकायला मिळतं, “आई ओरडेपर्यंत मला घाई करण्याची गरज नाही.”

म्हणून लहान मुलांसाठी शांत आवाजासोबत स्पष्ट सीमा आणि शांत follow-through आवश्यक आहे. मुलाजवळ जाऊन त्याचं लक्ष वेधणं, छोट्या वाक्यात सांगणं, शक्य असेल तर ट्रान्सझीशन वॉर्निंग transition warning देणं—“आणखी पाच मिनिटं खेळ, मग बूट घालायचे”—आणि नंतर शांतपणे कृतीकडे नेणं अधिक परिणामकारक ठरू शकतं.
पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न येतो—हेच तत्त्व आपण  टीनेजर्स मुलांनाही तंतोतंत लागू करू शकतो का?
नाही.

वय वाढतं तसं मेंदूची कार्यकारी क्षमता विकसित होत जाते. लक्ष दुसरीकडे वळवणे, सूचना लक्षात ठेवणे, आवेगावर नियंत्रण ठेवणे, नियोजन करणे आणि एखादं काम सुरू करणे याबाबत मोठ्या मुलांकडून अधिक स्वावलंबनाची अपेक्षा ठेवता येते. पण याचा अर्थ असा नाही की “मोठ्या मुलाला एकदा सांगितलं की त्याने त्याच क्षणी सगळं सोडून ते काम केलंच पाहिजे.”
समजा, किशोरवयीन मुलगा अभ्यास करत आहे. आई म्हणते, “दहा मिनिटांनी खाली येऊन जेव.”
त्याने ऐकलं, पण तो सध्याचा प्रश्न पूर्ण करून येऊ इच्छित असेल तर ते नेहमीच “ऐकत नाही” असं म्हणता येणार नाही. कारण मोठ्या व्यक्तीलाही लक्ष बदलण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. फरक एवढाच की मोठ्या मुलाने हळूहळू स्वतःचं लक्ष व्यवस्थापित करायला आणि दिलेली जबाबदारी स्वतः पार पाडायला शिकणं अपेक्षित आहे.

म्हणून किशोरवयात पालकांची भूमिका बदलते.
लहान मुलाला आपण सांगतो—
“चल, मी तुला हे करण्यासाठी मदत करते.”
मोठ्या मुलाला आपण सांगतो—
“हे तुझं काम आहे. ते कधी आणि कसं पूर्ण करायचं याची जबाबदारी तुझी.”
ही छोटीशी बदललेली भाषा मुलाला अवलंबून राहण्यापासून जबाबदार होण्याकडे घेऊन जाते.
आणि मग येतात किशोरवयातील ती परिचित वाक्यं—
“आत्ता नको.”“करतो ना!”“किती वेळा सांगणार?”“मला माहीत आहे.”
“मला माझं करू द्या.”
इथे प्रत्येक वेळी आवाज वाढवण्यापेक्षा पालकांनी एक पायरी मागे जाऊन विचार करायला हवा—माझ्या मुलाला खरंच सूचना समजली नाहीये, की तो सूचना मान्य करूनही कृती पुढे ढकलतोय?
ही दोन वेगळी कारणं आहेत.
किशोरवयीन मुलाला सूचना समजत असूनही ती न करण्यामागे कधी प्रेरणा नसू शकते, कधी काम कंटाळवाणं वाटतं, कधी स्क्रीन किंवा मित्रांमध्ये त्याचं लक्ष गुंतलेलं असतं, कधी स्वातंत्र्याची गरज असते आणि कधी पालक-मुलामधील आधीपासून तयार झालेला संवादाचा पॅटर्न कारणीभूत असतो.
त्यामुळे प्रत्येक “ऐकत नाही” यामागे हट्टीपणा शोधणं तितकंच चुकीचं आहे, जितकं प्रत्येक वेळी त्याची जबाबदारी पालकांनी स्वतः घेणं.

इथे पालकत्वाची पायरी बदलते.
लहान मुलाला—लक्ष बदलायला मदत.
शालेय वयातील मुलाला—स्वतः काम सुरू करण्याची सवय.
किशोरवयीन मुलाला—स्वतःच्या निर्णयांची आणि जबाबदारीची जाणीव.
आणि मोठ्या व्यक्तीला—परस्पर आदराने संवाद.
कारण मोठ्या माणसालाही प्रत्येक गोष्ट सांगितल्याबरोबर ती करावीच लागते असं नाही. तो ऐकू शकतो, समजू शकतो, पण त्याची स्वतःची कामं, प्राधान्यक्रम आणि निर्णय असतात. त्यामुळे “मी सांगितलं म्हणजे लगेच कर” हा अधिकाराचा आग्रह प्रौढ नात्यांमध्ये नेहमीच उपयोगी ठरेल असं नाही.
इथे एक सुंदर फरक लक्षात घ्यायला हवा—
लहान मुलाला आपण नियंत्रित करण्यापेक्षा रेग्युलेट करायला शिकवतो.
मोठ्या मुलाला आपण रिमाइंड  करण्यापेक्षा रिस्पॉन्सिबल  व्हायला शिकवतो.
आणि प्रौढ व्यक्तीशी आपण आदेशापेक्षा संवाद करतो.

म्हणून “ओरडल्याशिवाय ऐकत नाही” या वाक्याचा अर्थ प्रत्येक वयात वेगळा असू शकतो.
दोन वर्षांच्या मुलाला कदाचित तुमच्या आवाजापेक्षा तुमची जवळीक आणि मदत हवी असेल.
सात-आठ वर्षांच्या मुलाला स्पष्ट सूचना आणि सातत्यपूर्ण नियम आवश्यक असतील.
तेरा-सोळा वर्षांच्या किशोराला स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा समतोल हवा असेल.
आणि मोठ्या व्यक्तीला कदाचित आदेशापेक्षा परस्पर आदर आणि योग्य वेळ हवा असेल.
म्हणून पुढच्या वेळी मुलाने पहिल्या हाकेवर प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा लगेच आवाज चढवण्याआधी क्षणभर थांबा.
स्वतःला विचारा—
“तो मला ऐकत नाहीये, की त्याचं लक्ष अजून माझ्याकडे आलेलं नाही?”

आणि किशोरवयीन मुलाबाबत स्वतःला विचारा—
“याला माझी पुन्हा सूचना हवी आहे, की आता त्याने स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकण्याची वेळ आली आहे?”
आणि मोठ्या व्यक्तीबाबत—
“माझं म्हणणं ऐकणं आणि माझ्या म्हणण्यानुसार लगेच वागणं—या दोन गोष्टी मी एकच तर समजत नाही ना?”

कारण पालकत्वाचं खरं कौशल्य आवाज वाढवण्यात नाही; वयाप्रमाणे अपेक्षा बदलण्यात आहे.
लहान मूल तुमच्या मदतीने स्वतःला थांबवायला शिकतं.
मोठं मूल तुमच्या सातत्यातून स्वतःला सांभाळायला शिकतं.
किशोर तुमच्या विश्वासातून स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकतो.
आणि शेवटी आपल्याला अशी मुलं घडवायची आहेत की ज्यांना आई ओरडली म्हणून नाही, तर आईने शांतपणे सांगितलं तरी तिच्या शब्दांना अर्थ आहे म्हणून कृती करावीशी वाटेल.
पालकांचा आवाज मोठा असण्यापेक्षा, त्यांच्या शब्दांना वजन असणं महत्त्वाचं.
कारण ओरडून मिळवलेलं ऐकणं तात्पुरतं असतं;
समजून निर्माण केलेली जबाबदारी आयुष्यभराची असते.

 

लेखिका –
डॉ. स्वाती गानू टोकेकर 
(संकलन – विवेक गं. राऊत)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा