माझा देश – आजची परिस्थिती

SHARE:

देशाची आजची बदललेली परिस्थिती यावर साहित्यिक तथा कवी डॉ. शोभा माधव गायकवाड यांची प्रसिद्ध कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत…

माझा देश….

बदलतंय चित्र देशाचं, नवी पहाट येते,
तंत्रज्ञानाच्या वाटेवर प्रगती घडते l।१।l

एकीकडे चंद्राला गवसणी, गगन भरारी,
दुसरीकडे महागाईची चिंता घरोघरी l।२।l

तरुणांच्या हाती मोबाईल, स्वप्न डोळ्यात मोठी,
नोकरीच्या शोधात फिरे पिढी हाती डिग्री घेऊनी l।३।l

शेतकऱ्याच्या घामाला अजूनही मोल नाही,
बाजाराच्या लहरीपुढे त्याचं काही चालत नाही l।४।l

रस्ते झाले रुंद, उंच इमारती उभ्या,
पण माणुसकीची नाती होताहेत कुजक्या l।५।l

सोशल मीडियावर चर्चा, शब्दांचा बाजार,
सत्य-असत्याचा होतो रोजच चमत्कार l।६।l

जाती-पातीचे राजकारण अजूनही भारी,
एकतेचा मंत्र विसरली दुनिया सारी l।७।l

प्रदूषणाने झाकले आकाश, श्वास कोंडतो,
प्लास्टिकच्या विळख्यात निसर्ग रडतो l।८।l

बेटी बचाव, बेटी पढाव, नारा घुमतो,
पण आजही लेकीच्या सुरक्षेला जीव धाकतो l।९।l

तरीही आशा मोठी, देश माझा महान,
प्रत्येक संकटातून उठतो, ठेवतो अभिमान l।१०।l

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
अध्यक्ष, हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ,
आदिशक्ती बहु संस्था, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा