तुका म्हणे, शोभा सांगे…
प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांची परमार्थ मार्गाची वाटचाल व्यक्त होते. सर्व सामान्यपणे संत तुकारामांचे जीवन व त्यांनी सांगितलेले जीवनोपयोगी तत्वद्न्यान, त्यांनी केलेला उपदेश जनसामान्यांना ओळखीचा व आवडीचा वाटतो. तुकाराम एकतर जनसामान्यांप्रमाणे संसारी पुरुष होते. अनेक प्रकारच्या सांसारिक आपत्तींनी पोळून निघाले होते. संसारात राहून परमेश्वर प्राप्त करून घेता येतो हे त्यांनी स्वानुभवातून सांगितले. तसाच लोकांना उपदेशही केला. जनसामान्यांना तुकाराम जवळचे आणि आपलेसे वाटण्याचे हेच कारण आहे.
संत तुकारामांनी रचलेल्या प्रदीर्घ अशा अभंगातून त्यांनी आपले आत्मचरित्र सांगितले आहे.
“याती शूद्र वंश केला व्यवसाय l
आदी तो हा देव कुळ पूज्य ll”
या प्रदीर्घ अभंगातून संत तुकाराम स्वतःबद्दल सांगताना म्हणतात, “माझी जात शूद्र (कुणबी)आहे. घराण्याचं व्यवसाय वान्याचा आहे. म्हणजेच किराणा – जिन्नस तेल, गुळ,धान्य विकण्याचा आहे. पांडुरंगाची आराधना कुळ परंपरेने चालत आलेली आहे. संसारात अती दुःख वाट्याला आले. त्यातच आई बाप निवर्तले. आयुष्याचा फार मोठा आधार गेला. त्यानंतर लगेच दुष्काळ आला. दुष्काळामुळे आर्थिक स्थिती डबघाईला आली. आर्थिक घडी विस्कटल्यामुळे असलेला मानसन्मान गेला. दुष्काळात एक बायको अन्नान करून मेली. व्यवसायात आलेली तूट घरातील दारिद्र्य, अगदी जवळच्या व्यक्तींचे मृत्यू या विवंचनांनी, जीव अगदी त्रासून गेला.
संत तुकारामांकडे घरातील परंपरागत चालत आलेले आणि त्यांच्या ताब्यात असलेले स्वतःच्या मालकीचे पांडुरंगाचे देऊळ होते. त्याचा तुकारामांनी जीर्णोद्धार केला आणि त्याच मंदिरात एकादशीच्या दिवशी प्रथमच ते कीर्तनासाठी उभे राहिले..ते स्वतःहून कबूल करतात,
“नव्हते अभ्यासीही चित्त आधी l
काहीं पाठ केली संतांची उत्तरे l
विश्र्वासे आदर करोनिया ll”
पूर्वीचा त्यांचा असा काही फारसा अभ्यास नव्हताच. म्हणून त्यांनी मोठ्या विश्वासाने व आदराने संतवचने पाठ केली. जेणे करून आपल्या वाणीत सामर्थ्य यावे. वारकरी कीर्तनात जेव्हा अभंग गात असत. तुकाराम शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या मागे धृपद म्हणत असत. अशाप्रकारे त्यांचे पाठांतर वाढत गेले.
संत तुकारामांना संतांचा सहवास आवडत असे. आपल्यावर संतांची कृपा अखंड व्हावी असे सारखेच वाटत असे. संत सज्जनांकडून काही शिकायला मिळावे म्हणून त्यांनी संतांच्या पायाचे तीर्थ घेऊन सेवा केली.
“संतांचे सेविले तीर्थ पायवणी l
लाज नाही मनी येऊ दिली ll”
या कार्यामध्ये त्यांनी लाज येऊ दिली नाही. जमेल तेवढी लोकांची सेवा करण्यात देह कष्टविला. संसारातील आप्त स्वकीयांचे व लोकांचे बोलणे, त्यांचा सल्ला, त्यांची दुःखद वाणी आणि कुचकट बोलणी मनावर घेतली नाहीत.
“सत्य असत्याशी मन केले ग्वाही l
मनियेले नाही बहुमता ll”
मत मतांच्या गलबल्यात न फसता मनालाच साक्षी ठेवून त्यांनी सत्य असत्याचा स्वीकार केला.
बाबाजी चैतन्यांनी केलेल्या उपदेशाचा स्वीकार करून हरिनामावर दृढ विश्वास ठेवला. नामदेव पांडुरंगाच्या आज्ञेने त्यांना कविताची स्फूर्ती झाली आणि पांडुरंगाच्या चरणाची आस लागली. तुकाराम शूद्र असल्याने कवित्व करण्याचा अधिकार नाही. या सबबीखाली काही लोकांनी अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या. तेव्हा तेरा दिवस संत तुकाराम उपोषण करीत धरणे धरून बसले. या कारणामुळे त्यांचे चित्त अतिशय दुखावले गेले.
“बुडविल्या वह्या बैसलों धरणे l
केले नारायणे समाधान ll”
परंतु नारायणानेच वह्या तारून त्यांचे समाधान केले. संत तुकाराम म्हणतात की त्यांच्या जवळ सांगण्यासारखे पुष्कळ आहे. पण विस्तारभयास्तव एवढेच ते सांगू इच्छितात. आजपर्यंत तुकाराम जे जगले ते लोकांचा समोर आहेच. भविष्यात काय आहे हे सांगताना ते म्हणतात, ‘देवच जाणो’. संत तुकारामांना आशा आहे की कृपावंत नारायण भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही. हा त्यांचा स्वानुभव त्यांनी नेहमीच कथन केला आहे.
“तुका म्हणे माझे सर्व भांडवल l
बोलविले बोल पांडुरंगे ll”
तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे पांडुरंग त्यांचे सर्वस्व असून पांडुरंगच तुकारामांच्या मुखातून वदवून घेतो.
सदर अभंगातून तुकारामांनी आपली परमार्थाची वाटचाल आणि चरित्र देखील सांगितले आहे. तुकारामांच्या इतरही अभंगातून त्यांचे जीवनचरित्र सापडते. तुकारामांचे हे बाह्य चरित्र विविध अभंगातून पहायला मिळते. परंतु वरील अभंगात तुकारामांनी आपली संक्षिप्त जीवनकहाणी सांगितली आहे. ही जीवनकथा संत मंडळींनी त्यांना विचारली म्हणून त्यांनी सांगितली आहे. स्वतःच्या जीवनात वाट्याला आलेला जीवन संघर्ष त्यांनी प्रामाणिकपणे या अभंगातून मांडलेला आहे तसा त्यांनी शुद्धतेने व प्रामाणिकपणे, जीवन जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आलेखही यातून दिसून येतो.
अनेक विद्वान संत तुकाराम महाराजांचे चरित्र जमीन घेण्यासाठी अभंगांचा क्रम, प्रसंग आपल्या सोयीनुसार ठरवतात. तुकारामांनी या अभंगातून संक्षिप्त चरित्र सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांच्या साधन मार्गाचा बोध होत नाही. परंतु इतर अभंगातून साधनमार्गाची काही पदचिन्हे दिसतात.
तुकाराम महाराजांची अभंगरचना गुरुप्रसाद झाल्यानंतर, व खुद्द नामदेवांनी पांडुरंगासोबत येऊन आज्ञा केल्यानंतर म्हणजेच सिद्धावस्थेतील आहे. तुकारामांचे बहुतेक अभंग, कीर्तनाच्या प्रसंगाने, लोकोपदेश करण्याच्या निमित्ताने बाहेर पडले आहेत. सारेच अभंग भावावस्थेतील आहेत. तरीही त्यांच्या ह्या अभंगातून साधनमार्गाची वाटचाल कधीकधी होत गेली, साधकदशेपासून ते सिद्धावस्थेपर्यंत कसे पोचले या तुकारामांच्या प्रवासाचा निश्चितच उलगडा होतो.
तुकारामाच्या ह्या वाटचालीचे सुद्धा अनेक टप्पे आहेत.
लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






