पितृ मोक्ष अमावास्या –
भाद्रपद अमावास्या, असते पितृ मोक्षाची वेळ,
कावळ्याच्या रूपात येती, साधून पितर मध्यान्ह काळ ।l
वर्षभर वाट पाहती, लेकीच्या हातचे घास,
आज जेऊ घालते त्यांना, डोळ्यांत आणून आस।l
घरचे ज्येष्ठ गेले, पण आशा नाही गेली,
पितरांच्या नावाने आज, गोड खीर केली।l
वरण भात, भजे, कुरडई, पात्र सजवले छान,
अंगणात वाढले पान, यावा म्हणून कावळा लहान।l
‘काव काव’ ओरडताच, जीव माझा गेला भरून,
वाटते सारे आत्मे आलेय परत, माझ्या अंगणात उतरून।l
घास भरवते त्याला, अश्रू डोळ्यांत आणून,
म्हणते ‘बाबा जेवून जा, पोटभर समाधानी होऊन’।l
पितर कधीच मागत नाहीत, सोने नाणे, पैसा,
मागतात फक्त दोन घास, आणि थोडा आपुलकीचा वसा।l
ज्यांनी आपल्याला घडवले, त्यांना विसरू नका,
मोक्ष अमावास्येला तरी, उपाशी ठेवू नका।l
जेऊ घातले पितरांना, की घर होते पावन,
त्यांच्या आशीर्वादाने, होते परिपूर्ण जीवन ।l
सर्व ज्ञाती बांधवांनो, ही परंपरा जपून ठेवा,
शोभाजी म्हणे पितर जेवले, हीच त्यांची सेवा ।l
जिवंत पणी देखील द्या, त्यांना पोटभर अन्नसहित मान सन्मान,
मेल्यावर किती देखावे कराल, किती गिळला त्यांनी अपमान ।l
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






