नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सध्या राजकीय वातावरण अत्यंत तापले असून, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि मतदार याद्यांमधील कथित अनियमितता (SIR) व मतचोरीच्या मुद्द्यावरून ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोबतच आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी इंडिया आघाडी च्या शिष्टमंडळ ला भेट नाकारल्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) दिशेने विराट मोर्चा काढला आहे.

आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आणि पार्श्वभूमी :
इंडिया आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसेच मतदार याद्यांमधील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि ‘मतचोरी’च्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनापूर्वी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिष्टमंडळासह सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांची भेट घेण्याची विनंती केली होती. मात्र, हा मुद्दा आधीच न्यायप्रविष्ट (Sub-judice) असल्याचे कारण देत सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली. असे असले तरी, नागरिकांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने कायदेशीर मार्गाने येण्याचे आवाहन केले आहे.
कनॉट प्लेस आणि कॉन्स्टिट्यूशन क्लब परिसर मधे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे इतर मोठे नेते कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे जमले, तेथून दुपारी बाराखंभा रोड जंक्शनवरून सुप्रीम कोर्टाच्या दिशेने हा मोर्चा मार्गस्थ झाला. यामध्ये विरोधी पक्षांचे खासदार, आमदार, विविध विद्यार्थी संघटना आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक निर्बंध :
या हाय-प्रोफाइल मोर्चानंतर दिल्ली पोलिसांनी आणि प्रशासनाने सुरक्षेच्या अत्यंत कडक उपाययोजना केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (DMRC) पटेल चौक, जनपथ, राजीव चौक, मंडी हाउस, सेंट्रल सेक्रेटेरिएट आणि बाराखंभा रोड यांसारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे द्वार तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवले आहेत. तसेच सुप्रीम कोर्ट परिसर आणि मध्य दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनाला रोखण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय तापमान कमालीचे वाढले असून इंडिया आघाडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे केंद्र सरकार व निवडणूक आयोगावरील राजकीय दबाव अधिकच वाढताना दिसत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






