नागपूर : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात देवी दुर्गेच्या शक्तीचा जागर होत असताना, समाजातील युवतींना केवळ सांस्कृतिक उत्सव किव्हा गरब्यातील सौंदर्यवती म्हणून साजरे करण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष शक्तिसंपन्न व आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘चॅरवेती फाउंडेशन’च्या वतीने “आदिशक्ती आत्मसंरक्षण शस्त्र प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. “सशक्त युवती, सुरक्षित समाजाची पायाभरणी” या ध्येयवाक्याला अनुसरून हे विशेष शिबिर पार पडत आहे.
महाविद्यालयीन युवतींसाठी विशेष उपक्रम
या शिबिराचा मुख्य उद्देश समाजामध्ये महिला व युवतींवर होणारे अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी महाविद्यालयीन आणि तरुण युवतींना (वय १६ वर्षे व त्यापुढील) शारीरिकदृष्ट्या सक्षम, धीट, आत्मनिर्भर आणि सुरक्षित बनवणे हा आहे. शिबिरादरम्यान युवतींना पारंपारिक लाठी-काठी कला तसेच आधुनिक आत्मसंरक्षण तंत्रांचे (Self-Defense Techniques) सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे व पुढेही देण्यात येतील. याशिवाय शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, सहभागीता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकास या पैलूंवरही विशेष भर देण्यात आला.
उपक्रमाचा वाढता विस्तार
‘चॅरवेती फाउंडेशन’ने गेल्या वर्षीही अशाच स्वरूपाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते, ज्यामध्ये १०० हून अधिक मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. तोच उत्साह आणि प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा या उपक्रमाची व्याप्ती अधिक वाढवण्यात आली आहे. नागपूर शहरातील ५० हून अधिक ठिकाणी — ज्यात विविध क्लासेस, शाळा (९वी व १०वीच्या विद्यार्थिनी), महाविद्यालये आणि महिला मंडळे यांचा समावेश आहे — दोन दिवसीय शिबिरे यशस्वीरीत्या पार पडली आहेत.

“नवरात्र हा केवळ शृंगार नव्हे, तर शक्तीच्या उपासनेचा उत्सव” — शिवानी दाणी वखरे
या उपक्रमाविषयी माहिती देताना चॅरवेती फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नागपूर महानगर पालिकेच्या नगरसेविका शिवानी दाणी वखरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
“नवरात्रात दांडिया, गरबा आणि शृंगार यांचे आयोजन सर्वत्र होते आणि ते आनंददायीच आहे. परंतु, नवरात्र हा मूलतः शक्तीच्या उपासनेचा आणि जागरणाचा उत्सव आहे. आजच्या बदलत्या काळात प्रत्येक मुलगी आणि स्त्री स्वतःचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम असली पाहिजे. हाच मुख्य विचार मनात ठेवून आम्ही हे आदिशक्ती आत्मसंरक्षण शिबिर राबवत आहोत.”
१८ ऑक्टोबरला भव्य अंतिम प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन
शिबिरामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो युवतींच्या कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकांचा भव्य कार्यक्रम दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. लंडन स्ट्रीट, वर्धा रोडजवळ, रॅडिसन स्क्वेअर आणि जय प्रकाश नगरजवळ, सोमलवाडा, नागपूरयेथे आयोजित करण्यात आला आहे.
नागपूरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या प्रेरणादायी आणि थरारक प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपुरातील सर्व मातृशक्ती, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींचा उत्साह वाढवावा, असे आग्रहाचे आवाहन चॅरवेती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांची उपस्थिती युवतींचा आत्मविश्वास द्विगुणीत करेल आणि सुरक्षित समाज निर्मितीच्या या प्रवासाला अधिक बळ देण्यास मदत होईल. यापुढे ही जर महिलांना या प्रकारचे प्रशिक्षण पाहिजे असल्यास त्यांच्या साठी ‘चॅरवेती फॉउंडेशन’ नेहमी पुढाकार घेईल असे शिवानी दाणी वखरे यांनी सांगितले.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






