कल्याण मूकबधिर विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची कमाल; रेशीमबाग शाळेत साकारला ऐतिहासिक ‘लोहगड’ किल्ला

SHARE:

नागपूर : सरस्वती मंदिर संचालित कल्याण मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रेशीमबाग, नागपूर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट कलागुणांच्या बळावर पुन्हा एकदा शिवकालीन इतिहास जिवंत केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी ‘आमदार व खासदार सांस्कृतिक महोत्सव’ अंतर्गत आयोजित शिवकालीन किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वराज्याच्या इतिहासातील पराक्रमी व अजेय अशा ‘लोहगड’ किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारून सर्वांचेच मन जिंकले आहे.

आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून पाहणी

आमदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या भव्य लोहगड किल्ल्याचे परीक्षण करण्यात आले. परीक्षण करण्यासाठी आयोजन समितीच्या संयोजक श्रीमती निरजा पाटील, अविनाश अडकुलवार, आशिष येरंडे आणि रवींद्र सूर्यवंशी यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्याच्या प्रत्येक बारीक-सारीक तपशीलाची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी, कल्याण मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या ससाणे, शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग आणि उत्साह व उमेदीने भरलेले दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीसमोर सांकेतिक भाषेत प्रभावी सादरीकरण

खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजन समितीच्या वतीने देखील किल्ल्याची पाहणी व मूल्यांकन करण्यात आले. या समितीत संजय बंगाले, हेमंत देशपांडे, जगदीश बावणकर, आशिष येरंडे आणि आनंद मांजरखेडे यांनी पाहणी केली.

या पाहणी दरम्यान शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांकेतिक भाषेत लोहगड किल्ल्याचा इतिहास व त्याची रचना परिक्षकांसमोर मांडली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या अभिव्यक्तीला न्याय देत विशेष शिक्षिका सौ. स्वाती ईसरकर यांनी सांकेतिक भाषेचा अचूक अनुवाद करून विद्यार्थ्यांच्या भावना व माहिती परिक्षकांना समजवून सांगितली. किल्ल्याच्या निर्मितीसाठी घेतलेल्या अहोरात्र मेहनतीचा आणि यशाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झकत होता.

या महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या ससाणे, कलाशिक्षक नितीन जुनारे यांच्यासह शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. मूकबधिर विद्यार्थ्यांनी शारीरिक मर्यादांवर मात करत आपल्या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा