
धुळे : राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाचा धुराळा सुरू आहे. त्यात राज्यात धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेत मंत्री जयकुमार रावल यांनी जादू केली आहे. दोंडाईचा नगर परिषदेत भाजपने नगराध्यक्षपद बिनविरोध करत विजयाचे खाते उघडले आहे. मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल यांचा भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी तर नगरसेवक पदासाठी भाजपच्या ७ जणांचा एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने भाजपच्या नगराध्यक्षासह ७ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यात नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यानंतर आज छानणी प्रक्रिया पार पडली. यात दोंडाईचा वरवडे नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण आज झालेल्या अर्ज छानणी प्रक्रियेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.
यामुळे भाजपच्या नगराध्यक्षा पदाचा उमेदवार नयनकुंवर ताई रावल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय नगरसेवक पदासाठी ७ जागांवर केवळ भाजपच्याच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यात १ ब रविना महेश कुकरेजा, २ अ सरला छोटू सोनवणे, ७ ब चतुर जिभाऊ पाटील, ८ ब राणी राकेश अग्रवाल, ९ अ वैशाली प्रवीण महाजन, ९ ब निखिलकुमार रवींद्र जाधव, १३ अ भरतरी पुंडलिक ठाकूर यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात भाजपने आपले नगराध्यक्ष बिनविरोध करून खाते उघडले आहे. यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. या निवडीनंतर जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा येथील रावल गढीवर फटाके फोडून, ढोल ताशे वाढवून जल्लोष करण्यात आला.





