
सांगली – टीम इंडियाची उपकॅप्टन स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलच्या विवाहसोहळ्यात रविवारी (२३ नोव्हेंबर) अनपेक्षित वळण घेतले. वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर स्मृतीने जागेवर लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला. ही माहिती स्मृतीचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिली. यानंतर पलाशची सुद्धा पित्ताचा त्रास वाढल्याने त्याला सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तो हाॅटेलकडे गेला. दरम्यान, स्मृतीचे वडिल श्रीनिवास यांच्यावर सांगलीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगलीतील समडोळी रोडवरील मानधना फार्महाऊसमध्ये मेहंदी आणि संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. लग्नविधी रविवारी दुपारी सुरू होणार होता. परंतु, त्यापूर्वी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना अचानक आजारी पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. तिच्या संगीत समारंभातील एक व्हिडिओ, ज्यामध्ये स्मृतीने पलाश मुच्छलसाठी खास नृत्य केले होते. तिच्या नृत्याने केवळ कुटुंब आणि पाहुण्यांनाच नव्हे तर चाहत्यांनाही आश्चर्यचकित केले.





