सचिन तेंडुलकर-लिओनेल मेस्सी यांची ऐतिहासिक भेट! सचिनने दिली जर्सी, तर मेस्सीनेही दिलं ‘हे’ स्पेशल रिटर्न गिफ्ट….

SHARE:

मुंबई – जसं क्रिकेट म्हंटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सचिन तेंडुलकर येऊन उभा राहतो. अगदी तसेच फ़ुटबॉल म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर लिओनेल मेस्सी उभा राहतो. दोघेही त्यांच्या खेळातील दिग्गज खेळाडू आहेत. याच दिग्गजांची भेट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाली.
क्रीडा विश्वात १०  नंबर जर्सीला ओळख मिळवून देणारे दोन दिग्गज खेळाडू मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भेटले. सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी यांची मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भेट झाली, यावेळी सचिनने मेस्सीला त्याची क्रिकेट जर्सी भेट दिली. क्रिकेट आणि फुटबॉलच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरला.

लिओनेल मेस्सीने वानखेडे स्टेडियमवर माजी भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर “मास्टर ब्लास्टर” सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांमध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

सचिन तेंडुलकरने मेस्सीला त्याची २०११  ची एकदिवसीय विश्वचषक जर्सी भेट दिली. तसेच अर्जेंटिनाच्या फुटबॉल दिग्गजाने सचिन तेंडुलकरला २०२२  च्या विश्वचषकाचा चेंडूही भेट दिला. सचिन तेंडुलकर काय म्हणत आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत एक ट्रान्स्लेटर सुद्धा उपस्थित होता.

मेस्सीबद्दल सचिन काय म्हणाला?
दरम्यान, सचिन तेंडुलकरला लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीबद्दल त्याचे काय मत आहे असे विचारण्यात आले. ते म्हणाले, “आम्ही लिओनेल मेस्सीच्या चिकाटीचा आणि वचनबद्धतेचा आदर करतो. त्याच्या नम्र स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल त्याचे खूप कौतुक आहे. मुंबई आणि भारतातील लोकांच्या वतीने, मी मेस्सी आणि त्याच्या कुटुंबाला आनंद आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.”

मेस्सीचा भारत दौरा
१३  डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी कोलकाता येथे पोहोचला, त्यानंतर हैदराबाद येथे त्याने राहुल गांधींची भेट घेतली आणि एका प्रदर्शनीय सामन्यात तो सहभागी झाला. तो आज म्हणजेच १४  डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचला आणि उद्या, १५  डिसेंबर रोजी दिल्लीला जाणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा