
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडे शिवारातील वनजमिनीवर अंमली पदार्थ गांजाची लागवड केल्याचं पुन्हा उघडकीस आलं. पोलिसांनी कारवाई करत ही शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ८५ लाख १३ हजार रुपये किमतीची १ हजार ७०२ किलो वजनाची गांजाची झाडं मुळासकट उपटून जागेवरच नष्ट करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कोट्यवधी रुपयांचा गांजा जागेवरच नष्ट
शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात अधिक प्रमाणात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची वनजमिनीवर लागवड केली जाते. एका महिन्याच्या कालावधीत लागोपाठ दोन कारवाया करून कोट्यवधी रुपयांचा गांजा जागेवरच नष्ट करण्यात आला होता. पुन्हा एकदा महादेव दोंडवाडे शिवारात वनजमिनीवर गणपत साहेबराव पावरा याने आर्थिक फायद्यासाठी गांजाची शेती केल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी पथक तयार करून महादेव दोंडवाडा शिवारातील गणपत साहेबराव पावरा याच्या शेतात छापा टाकला असता, त्या ठिकाणी एक एकर जागेवर गांजाची झाडे आढळून आली.
गांजाची झाडे मुळासकट काढली
पथकाने गांजाची झाडे मुळासकट उपटून मोजमाप केले असता ८५ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीच्या १ हजार ७०२ किलो वजनाच्या गांजाची झाडं जाळून नष्ट करण्यात आली आहेत. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गणपत साहेबराव पावरा याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक मिलिंद पवार व कर्मचाऱ्यांनी केली.
LCBने सापळा रचला अन्…
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रादाराकडून ३ लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षकाला एसीबीने अटक केली आहे. नितीन लिलाधर ठाकूर (वय ४६, रा.देवपूर, धुळे) असं या शिक्षकाचं नाव आहे.




