
अहमदाबाद : हार्दिक पंड्याची धमाकेदार फटकेबाजी आणि त्याला तिलक वर्माची मिळालेली तुफानी फलंदाजीची साथ.. या जोरावर भारताने पाचव्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय साकारला. या दोघांनीही धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावली आणि त्यामुळेच भारताला २० षटकांत २३१ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करतान दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली खरी, पण त्यांना विजय काही साकारता आला नाही. भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय साकारत वर्षांचा शेवट गोड केला. भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवरर ३० धावांनी विजय साकारला आणि मालिका ३-१ अशी सहजपणे जिंकली.
भारताला संजू सॅमसन आणि अभिषेक वर्मा यांनी झोकात सुरुवात केरून दिली होती. पण या दोघांनाही अर्शशतकं पूर्ण करता आली नाहीत. पण ही कसर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी भरून काढली. तिलक वर्माने यावेळी भारताच्या डावाला चांगला आकार दिला आणि मोठ्या धावांचा पाया रचला, त्यावर हार्दिक पंड्याने कळस चढवला. कारण हार्दिकने पहिल्याच चेंडूपासून दणकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर हार्दिकने षटकार वसूल केला.
हार्दिकने आपले अर्धशतक १६ चेंडूंत झळकावले खरे, पण त्यामध्ये पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता, म्हणजेच ९ चेंडूंत त्याने ४६ धावा पूर्ण केल्या होत्या. पण हार्दिकपूर्वी तिलक वर्माने दमदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. हार्दिक आणि तिलक यांनी चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली आणि तिथेच हा सामना भारताच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. हार्दिकने यावेळी २५ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६३ धावा केल्या. तिलक अखेरच्या षटकापर्यंत मैदानात राहीला आणि त्याने ४२ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७३ धावा केल्या.
भारताच्या २३२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या क्विंटन डीकॉकने एकामागून एक फटक्यांची अतिषबाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हाल्ड ब्रेव्हिस त्याला चांगली साथ देत होता. पण जसप्रीत बुमराहने क्विंटन डीकॉकला बाद केले आणि त्यानंतर हा सामना भारताच्या दिशेने फिरायला सुरुवात झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी गडगडली आणि भारतान विजय साकारला.





