ठाकरेंच्या आमदारकीचे जेमतेम ५ महिने, विधान परिषदेत मविआचं संख्याबळ ७ ने घटणार, मोठा फटका बसण्याचे संकेत…

SHARE:

मुंबई : काँग्रेसला रामराम ठोकत प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर, विधान परिषदेतील काँग्रेस आणि विशेषत: महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी झाले आहे. यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत काय निर्णय घेतला जातो, याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मात्र नववर्षात परिषदेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ आणखी कमी होणार असल्याने, ज्येष्ठांच्या सभागृहातही आघाडीला सरकारविरोधात आवाज उठवणे कठीण होणार आहे.

आगामी वर्षात, २०२६ मध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे राजेश राठोड, अभिजीत वंजारी, जयंत आसगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे शशिकांत शिंदे आदींचा परिषदेतील कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नववर्षात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार आहे.

गांधी घराण्याचे, विशेषत :
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिवगंत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. विधिमंडळाने सातव यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यासंदर्भातील परिपत्रक गुरुवारी रात्री जाहीर केले. यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. प्रामुख्याने याचा फटका महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यात बसू शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

महाविकास आघाडीसमोर ही नवी चिंता निर्माण झालेली असताना, नववर्षात अनेक आमदारांचा परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळही याच दिवशी संपत आहे. राष्ट्रवादी शपचे अरुण लाड यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी, तर काँग्रेसचे राजेश राठोड यांचाही कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. काँग्रेसचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, यांच्यासह पुणे शिक्षक मतदारसंघाचे काँग्रेसचे जयंत आसगावकर तसेच अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचाही कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ ला संपणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा