
मुंबई – चंद्रपूर येथील नगर पंचायत निवडणुकीतील पराभवामुळे चर्चेत आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हसंराज अहिर हेही उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत चंद्रपूर नगर पालिकेत भारतीय जनता पक्षाला पराभवाचा फटका बसला. पक्षाचा हा पराभव सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का मानला जात होता. या पराभवानंतर मुनगंटीवार यांनी स्थानिक नेत्यांच्या कामकाजावर जोरदार टीकाही केली होती. या टीकेनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.
चर्चा विकासात्मक मुद्द्यांवर
मुख्यमंत्र्यांशी विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर २० हजार बोनस, आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून ३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मदत, तसेच बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलिस दल व महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पॉवर हाऊसची ३१.३५ हेक्टरमधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आग्रही मागणी केली.





