
मुंबई – सायबर ठगी प्रकरणात, पटियाला पोलिसांनी गुरुवारी रात्री ठाणे जिल्हा आणि मुंबई येथून सात आरोपींना अटक केली. मीरा-भाईंदर भाजप युवा मोर्चाचा नवघर मंडळ अध्यक्ष रणजीत नामदार सिंग उर्फ शेरा ठाकूर हा टोळीचा म्होरक्या आहे. तो मूळचा वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील आहे.
नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत आहेर यांनी सांगितले की, फसवणुकीच्या रकमेतील १.१० कोटी रुपये आरोपी शेरा ठाकूरच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. कामगारांच्या नावाने मिळवलेले ६०० सिमकार्ड आरोपींकडून जप्त करण्यात आले. पटियाला पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनदीप सिंग यांनी सांगितले की शेरा ठाकूर व्यतिरिक्त, अटक केलेल्या इतर सहा जणांमध्ये प्रतीक उत्तम बाफना, आशिष कुमार संतोष कुमार पांडे, मोहम्मद रिजवान शरीफ, चंद्रकांत खेमदास शामदासानी आणि सोमनाथ सनथकुमार खनाल यांचा समावेश आहे.
मीरा रोड कोर्टाकडून आरोपींना ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर पंजाब पोलिस शुक्रवारी पटियालाला रवाना झाले. आतापर्यंत या प्रकरणात १० जणांचा सहभाग उघड झाला आहे. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीचे पैसे २५ बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. तपासानंतर पंजाब पोलिसांच्या सायबर टीमने या खात्यांमधील ३.५० कोटी रुपये गोठवले आहे.
स्थानिक भाजप युवा मोर्चाच्या नेत्याला अटक केल्यामुळे राजकारण तापले आहे. शिंदेसेनेचे नेते आणि वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरोप केला की शेरा ठाकूर हा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचे भाऊ विनोद मेहता यांचा भागीदार आहे. त्यामुळे विनोद मेहता यांचीही चौकशी झाली पाहिजे.
माहित असावे कि पंजाबचे माजी पोलीस महानिरीक्षक अमर सिंग चहल यांना सायबर घोटाळ्यात 8.10 कोटींचा फटका बसला होता. या दबावामुळे व्यथित होऊन त्यांनी २२ डिसेंबर रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सायबर फसवणुकीच्या तपासात मीरा-भाईंदरशी संबंध असल्याचे उघड झाले, जिथे मुख्य आरोपी भाजपचा भाईंदर नवघर युवा मोर्चा मंडळाचा अध्यक्ष असल्याचे निष्पन्न झाले.




