ओडिशात पादरीला मारहाण, गायीचे शेण खायला लावले, जय श्रीरामच्या घोषणा देण्यास भाग पाडले

SHARE:

ओडिसा – भाजप शासित ओडिशात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून एका पादरीला मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर पादरीला गायीचे शेण खाण्यास भाग पाडण्यात आले, चप्पलांचा हार घालण्यात आला आणि जय श्री रामच्या घोषणा देण्यास भाग पाडले. ही घटना ढेंकनाल जिल्ह्यातील परजंग गावात ४ जानेवारी रोजी घडली, परंतु ही बातमी नुकतीच समोर आली आहे. घटनेला दोन आठवडे उलटूनही या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे वृत्त आहे. पीडित पादरीचे नाव बिपिन बिहारी नाईक असे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पास्टर बिपिन बिहारी नाईक त्यांच्या पत्नी आणि काही इतरांसह एका घरात प्रार्थना सभा घेत होते. तेथे सात कुटुंबे प्रार्थना करत होती. अचानक, घराबाहेर सुमारे 40 लोकांचा जमाव जमला आणि जबरदस्तीने आत घुसले. जमावाने आत असलेल्या सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मकतूब मीडियाच्या वृत्तानुसार, पाद्रीची पत्नी वंदना म्हणाली कि आमची मुले आणि मी कसेबसे घरातून पळून जाण्यात यशस्वी झालो आणि जवळच्या पोलिस स्टेशनकडे एका अरुंद गल्लीतून पळत गेलो. असा आरोप आहे की विनंती करूनही पोलिस लगेच मदत करण्यासाठी आले नाहीत.

बजरंग दलाच्या सदस्यांनी पाद्री बिपिनला बाहेर ओढले आणि काठ्यांनी मारहाण केली. त्यांना चप्पलांचा हार घालण्यात आला आणि गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांना गावातील हनुमान मंदिरात नेण्यात आले आणि त्यांचे हात बांधण्यात आले. जमावाने त्यांना गायीचे शेण खाण्यास भाग पाडले. जमावाने त्यांना मारहाण केली आणि वारंवार जय श्री राम अशा घोषणा देण्यास भाग पाडले.
मकतूब मीडियाच्या वृत्तानुसार, वंदना म्हणाली कि माझा पती गंभीर जखमी झाला होता. लोक त्यांना मारहाण करत राहिले आणि त्यांच्या तोंडात शेन भरत राहिले. पोलिस आल्यानंतरही जमाव लगेच थांबला नाही. बराच विलंब झाल्यानंतर अखेर पाद्रीची सुटका करण्यात आली आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

अहवालानुसार, एका सामाजिक कार्यकर्त्याने आरोप केला आहे की पाद्रीला जवळजवळ एक तास वैद्यकीय मदत न घेता पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आणि त्याच्या जखमांवर उपचार करण्यात आले नाहीत. परजंग गाव प्रामुख्याने हिंदू आहे, तेथे फक्त सात ख्रिश्चन कुटुंबे राहतात. अहवालानुसार, जमावाने आरोप केला आहे की पाद्री जबरदस्तीने लोकांचे धर्मांतर करत होते. पोलिसांनी या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे, परंतु पाद्रीवर जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप करत उलट एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
पाद्रीचा भाऊ उदय नाईक यांनी कॅथोलिक कनेक्टला सांगितले की स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तेव्हा ते सुमारे 45 ख्रिश्चनांना पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र, कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला, असा आरोप केला की हा हल्ला पूर्वनियोजित होता. जर पोलिस वेळेवर पोहोचले असते तर त्यांच्या भावाला वाचवता आले असते.
या घटनेवरून कॅथोलिक चर्चने भाजपव तीव्र टीका केली आहे. चर्चचे मुखपत्र दीपिका मध्ये प्रकाशित झालेल्या ‘काउ डंग फोर्स फीडर्स’ या शीर्षकाच्या संपादकीय लेखात भाजपशासित राज्यांमध्ये ख्रिश्चनांवरील वाढत्या हिंसाचाराकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या संपादकीय लेखात म्हटले आहे की पादरीला गोमूत्र खायला दिल्यानंतर, काही राष्ट्रविरोधी घटक ‘जय श्री राम’ असा जयघोष करत घटनास्थळावरून निघून गेले.

या लेखात केंद्र सरकारच्या अशा बाबींवरच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे आणि असे म्हटले आहे की राजकीय इच्छाशक्ती असेल तर अशा घटना रोखता येतील. केरळमध्ये अद्याप अशा घटना घडल्या नाहीत हे लक्षात घेऊन, तरीही अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विषारी भाषणबाजी सांप्रदायिक मानसिकतेला चालना देते. केरळमध्ये जातीयवाद रोखण्याचा दावा करणारे इतरत्र द्वेषपूर्ण भाषणांना आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत, असेही संपादकीयमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा