मुख्यमंत्री हतबल, त्यांना काहीही करता येत नाही, महाड राड्यावरून हायकोर्टाने सुनावले खडे बोल

SHARE:

रायगड – महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यानंतर शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांचे सुपूत्र विकास गोगावले फरार असून ते अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. या प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाने फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की त्यांना याप्रकरणी काहीही करता येत नाही, अशी फटकार लावली आणि भरत गोगावलेंना मुलाला हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. नवे नगर परिसरात मतदान सुरू असताना अचानक शिवसेना आणि राष्ट्रावादीतील कार्यकर्त्यांच्या गटात हाणामारी झाली होती. माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप गटाचे नेते सुशांत जाबरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्याप्रकरणी गोगावले यांच्या मुलावर, पुतण्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र विकास गोगावले अजूनही फरार असून पोलिसांच्या हाताला लागलेला नाही.
मंत्र्याच्या मुलासह इतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. सरकार कोणालाही २४ तासात अटक करू शकते. पण जेव्हा अटक करायची नसते तेव्हा ते अशी प्रतिज्ञापत्रं सादर करतात, अशे ताशेरे हायकोर्टाने फडणवीस सरकारवर ओढले. महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झालं आहे. माननीय मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचे कान टोचले.

यावेळी आपला मुलगा फरार नसून आपल्या संपर्कात असल्याचं भरत गोगवलेंच वक्तव्य हायकोर्टाच्या समोर येताच अद्याप गोगावलेंचा जबाब का घेण्यात आला नाही असा सवाल राज्य सरकारला करण्यात आला. मुलगा बेपत्ता असल्याबद्दल त्यांचा देखील जबाब नोंदवा, असे निर्देश न्यायालयाने दिले. गुन्हे करून मंत्र्यांची पोरं मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात असतात पण पोलिसांना सापडत नाहीत? आणि तरीही मंत्री मात्र खुशाल मंत्रिमंडळात बसतात? राज्यात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा सवाल उपस्थित केला.
महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर हे सगळे आरोपी फरार आहेत. तेव्हापासून विकास गोगावले यांना अटक करण्यास पोलिसांना अपयश आलं आहे. या प्रकरणात भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.
सरकारने या सर्व आरोपींबाबत आपली नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडून स्पष्ट निर्देश घेण्याची सूचना देखील राज्य सरकारला केली आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता राज्य सरकार या प्रकरणात नेमकी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलं आहे.

Leave a Comment

अधिक वाचा