धाराशिव – भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेत बहुमतासाठी २८ चा आकडा गाठण्यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात मोठी लढाई पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. स्पष्ट बहुमताचा आकडा २८असताना, सत्ता स्थापनेसाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेना शिंदे गट नेते तानाजी सावंत यांनी तयारी चालू केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार आहेत. धाराशिवमध्ये ठाकरे गट व काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेत तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, हे तीन पक्षांची यूती करताना सावंत यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान आहे. धाराशिव मधील शिवसेनेतीलच एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचीही राजकीय चर्चा सुरू आहे.
धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेनेला बहुमतासाठी समोर भाजपाचे आव्हान आहे. धाराशिवमधील सध्याच्या राजकीय हालचालीनुसार दोन्ही शिवसेना प्रमुख चर्चेत आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप १९ जागा, शिंदे गटाच्या शिवसेनेला १५ जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही.
धाराशिव जिल्ह्यातील या जिल्हा परिषद निवडणूकीत सर्वात मोठा धक्का खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना बसला आहे. ठाकरे गटाने ४४ जागा लढवून केवळ ७ जागा जिंकल्या आहेत, तर तानाजी सावंत यांनी आपल्या मतदारसंघातील १३ पैकी ८ जागा जिंकल्या आहेत, बंडखोरी करणारे धनंजय सावंत हेही विजयी झाले आहेत.
धाराशिवमध्ये निवडून आलेला कोणताही सदस्य बंडखोरी करू नये, यासाठी सर्व पक्षांनी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठविल्याची चर्चा आहे. धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेपर्यंत सदस्य सुरक्षित ठेवण्यावर सर्वच राजकीय पक्षांचा भर दिसतो आहे. जिल्ह्यात महायुतीला संख्याबळ असले तरी अध्यक्षपद नेमके कुणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धाराशिव जिल्ह्यात सध्या तरी दोन्ही शिवसेना जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याच्या हालचाली सूरू आहेत.




