गडचिरोली – एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात काँग्रेस आमदारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सूरू आहेत. जिल्ह्यातील कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री मुरुम उपसा सुरू असताना आमदार मसराम आपल्या ५ लोकांना घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. गडचिरोली मुरूम उत्खननप्रकरणी एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून, आरमोरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रामदास मसराम यांच्यासह ६ जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल विकास राजगडे असे मजुराचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री मुरुम उपसा सुरू असताना, आमदार मसराम आपल्या सहकाऱ्यांसह आले असताना येथे मुरुम उत्खनन कसे काय सुरू आहे? अशी विचारणा करत त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या मजुरांशी वाद घातला होता. यावेळी कुणालने तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगत, कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. यावरून वाद वाढला. आणि चिडलेल्या जमावाने काठीने व हाताबुक्कयांनी या मजूराला बेदम मारहाण केली आहे. असा आरोप मजूर कुणाल राजगडेने तक्रारीत केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आमदार रामदास मसराम यांच्यासह निवृत्त शिक्षक धनपाल मिसार, अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गडचिरोलीतील मुरुम उत्खननाबाबत तक्रारी आल्या होत्या. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी लोकांना घेऊन तिथे गेलो होतो, अशी प्रतिक्रिया आमदार रामदास मसराम यांनी दिली आहे.




