सातारा – जिल्ह्यातील बँक घोटाळा प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सातारा जिल्ह्यामधील कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विंग गावातून अटक केली आहे.
बरेच दिवस फरार असल्यामूळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कराडमध्ये गुप्त माहितीच्या आधारे ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या बँक घोटाळा प्रकरणात विट्ठल कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण संचालक मंडळ, ५ वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह ५० जणांविरोधात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेच्या लेखापरीक्षणात बोगस कर्जप्रकरणाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.
सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ,५ अधिकारी आणि संबंधित नातेवाईक यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण न घेता कर्जवाटप केले आहेत. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नव्याने कर्जखाती उघडणे, सरकारच्या निधीचा गैरवापर करणे, दस्तऐवजांमध्ये फेरफार करणे आणि खोट्या नोंदी करून ठेवीदार व सभासदांच्या हिताला नुकसान पोहोचवणे, असे गंभीर आरोप फिर्यादीत केले आहेत.
९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६१, ३१६ (२), ३१६(४), ३१८(४) ,३३६(३), ३३९, ३३९, ३४०(२) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात प्रवर्तन संचालनालय ईडीकडूनही कारवाई करण्यात आली आहे. चरेगावकर यांच्या बंगल्यावर तसेच यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे.
मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या घोटाळ्यात आणखी कोणती नावे समोर येणार आहेत, यांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राज्यात सहकार क्षेत्रातील या प्रचंड आर्थिक घोटाळ्यामुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये भीती पसरली आहे.





