मुंबई : चोरट्याने अनेक महागड्या बाईक लिलया चोरल्या होत्या. या चोरट्याकडून चार मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्यांची किंमत १ लाख ९५ हजार रुपये आहे.
मोटर सायकली चोरी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी केला आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश केला आणि एका सराईत आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी आग्रा येथून डुप्लिकेट चावी आणून कल्याण शहरात दुचाकी चोरी करायचा अशी अजब माहिती उघडकीस आली आहे. या चोरट्याकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ९५ हजार रुपये आहे. हा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कल्याण बाजारपेठ पोलिसांना मोटर सायकल चोरी करणारा आरोपी कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी कल्याण पश्चिमेकडील बोंबिल गल्ली परिसरात सापळा रचला. पोलिसांनी यावेळी शाहरूख जाकीर हुसेन (वय २७) याला अटक केली. तो मूळचा आग्रा येथील असून सध्या कल्याणमध्ये रस्त्यांवर फिरस्ता म्हणून राहत होता.
दिनांक २ मार्च २०२६ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी चोरीस गेलेली बजाज कंपनीची CT ११०(MH-०५ FC ८९२० ) मोटारसायकल घेऊन उभा असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीने गेल्या ५ ते ६ महिन्यांत कल्याण शहरातील विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.सदर गुन्हे महाराष्ट्र पोलीस अंतर्गत बीएनएस कलम ३०३ ( २ ) प्रमाणे नोंदविण्यात आले आहेत. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.




