जळगाव – चाळीसगावमध्ये अपघाती मृत्यु झाल्याचा बहाणा करून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रकार उघड झाला आहे. ५० लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलीस आणि डॉक्टरला मॅनेज करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आतापर्यत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता.
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलिस ठाण्यातील ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमा अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडकीस आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांची बोगस प्रकार उघड झाला आहे. खासगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता. दावा करताना १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिली होती.
राजेंद्र जाधव जखमी झाले होते. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव ग्रामीण येथील डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना, पोलिसांना प्राथमिक अहवालासह पोस्टमार्टम रिपोर्ट दिला होता. त्यानंतर याप्रकरणी मेहुनबारे पोलिस ठाण्यात एफआयआर क्र. ८६ /२०२५ अशी नोंद करण्यात आली होती. मात्र विमा कंपनीने या विमा प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ,त्यात अनेक विसंगती दिसून आल्या आहेत.
तपासात राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचे समोर आले आहे. तसेच ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्येही त्यांची नोंद नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय मृताच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते आहेत, तर त्यांच्या नावावर इतर सुमारे १० विमा कंपन्यांकडूनही पॉलिसी घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
यावरून या प्रकरणातील आरोपीचा अपघात व मृत्यूचे संपूर्ण बनावट प्रकरण तयार करून विमा रक्कम मिळवण्याचा कट रचला होता असे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा चालक-मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर तसेच मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मयत व्यक्तीचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे बनावट पद्धतीने विमा रक्कम मिळवून देणारी टोळी सापडली आहे. या प्रकरणात विमा कंपन्यांकडून ७,५००० रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला आहे. जळगाव जिल्हयात अपघाताचा खोटा बहाणा करून पैसे लुटणारी टोळी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास पोलिस करत आहेत.





