अमेरिका – इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रंप सरकारला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक जोसेफ केंट यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात केंट यांनी म्हटले आहे की इराणकडून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका नाही. या अधिकाऱ्याने दावा केला की इस्रायल आणि अमेरिका-समर्थित लॉबींच्या दबावामुळे हे युद्ध पुकारण्यात आले, असा गंभीर आरोप जोसेफ केंट यांनी केला.
जोसेफ केंट यांनी म्हटले की जून २०२५ पर्यंत मध्यपूर्वेतील युद्धांमुळे अमेरिकेला होणारी संभाव्य जीवितहानी आणि आर्थिक नुकसानीची डोनाल्ड ट्रम्प यांना जाणीव होती. असे असूनही, इस्रायली अधिकारी आणि अमेरिकन माध्यमांमधील प्रभावशाली सदस्यांनी चुकीच्या माहितीच्या मोहिमेद्वारे या युद्धाला प्रोत्साहन दिले. जोसेफ केंट यांनी २००३ च्या इराक युद्धाचे उदाहरण दिले. त्यांनी २००३ मधील परिस्थितीची तुलना इस्रायलच्या अशाच डावपेचांशी केली, ज्याद्वारे अमेरिकेला इराण युद्धात ओढण्यात आले.
जोसेफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इको चेंबरचे म्हणजे एकाच विचारांच्या गटाचे बळी म्हटले आहे. ते म्हणाले की इराण हा एक तात्काळ धोका आहे, असा धोरणात्मकदृष्ट्या ट्रम्प यांना विश्वास दिला गेला होता. जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला असता तर विजय सोपा झाला असता, पण तसे झाले नाही. जोसेफ केंट यांनी ट्रम्प यांना इराणसोबत सुरू असलेल्या युद्धावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. त्यांनी इशारा दिला की हे युद्ध अमेरिकेला आणखी अराजकतेत लोटू शकते.
अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या राजीनामा पत्रात लिहिले कि खूप विचारविनिमय केल्यानंतर मी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या संचालक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी सद्सद्विवेकबुद्धीने इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाचे समर्थन करू शकत नाही. इराणकडून आपल्या राष्ट्राला कोणताही अवाजवी धोका नाही. हे स्पष्ट आहे की इस्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे आपण हे युद्ध सुरू केले आहे. त्यांनी पुढे लिहिले तुम्ही तुमच्या २०१६ , २०२० आणि २०२४ च्या निवडणूक प्रचारात आणि तुमच्या पहिल्या कार्यकाळात राबवलेल्या परराष्ट्र धोरणांना आणि मूल्यांना माझा पाठिंबा आहे.
जोसेफ केंट यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की जून २०२५ पर्यंत तुमच्या लक्षात आले होते की मध्य-पूर्वेतील युद्ध हा एक सापळा होता, ज्यामुळे अमेरिकेच्या वीरांना आपले मौल्यवान प्राण गमवावे लागले. या युद्धामुळे आपल्या राष्ट्राची संपत्ती क्षीण झाली. तुमच्या पहिल्या प्रशासनात कोणत्याही आधुनिक राष्ट्राध्यक्षांपेक्षा तुम्हाला हे अधिक चांगल्या प्रकारे समजले होते की बळाचा वापर न करता लष्करी शक्तीचा निर्णायकपणे वापर कसा करायचा.
त्यांनी पुढे लिहिले कि इस्रायलच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आणि अमेरिकन माध्यमांतील प्रभावशाली सदस्यांनी एक अपप्रचार मोहीम राबवली, ज्यामुळे तुमच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाला पूर्णपणे सुरुंग लागला. या मोहिमेने इराणसोबतच्या युद्धाला खतपाणी घालण्यासाठी युद्ध-समर्थक मजकूर पसरवला. इराण हा अमेरिकेसाठी धोका आहे आणि तुम्ही आताच हल्ला केला पाहिजे. हे एक खोटे होते आणि हीच ती युक्ती आहे जी इस्रायलने आम्हाला इराक युद्धात ओढण्यासाठी वापरली होती, ज्यामुळे आपल्या देशाला हजारो पुरुष आणि महिलांचा जीव गमवावा लागला. आपण ही चूक पुन्हा करू शकत नाही





