मुंबई – भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे कथित संबंध आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो-व्हिडिओ यामुळे रूपाली चाकणकर दुसरा धक्का बसला आहे. अगोदर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला तर आता राष्ट्रवादी कांग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील त्यांना सोडावे लागले आहे. रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
भोंदू बाबा अशोक खरातला गुरू मानणे रूपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका होत होती. पक्षातील अनेकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे केली होती. अखेर वाढता दबाव लक्षात घेता, चाकणकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा.
रुपाली चाकणकर यांनी स्वतः ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत स्पष्ट केले की खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट आहे. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा बेकायदेशीर कृत्यांत माझा दुरान्वयेही संबंध नाही. तपासादरम्यान या सर्व गोष्टी समोर येतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुराव्याशिवाय माध्यमांमधून होत असलेले आरोप अत्यंत वेदनादायक आहेत, पण सत्य लवकरच प्रखरतेने सिद्ध होईल, असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
भोंदू अशोक खरातवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सध्या एसआयटीकडून त्याचा कसून तपास सुरु आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरही टीका सुरूच असल्याने अखेर रूपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांना दुहेरी झटका बसला आहे.
अशोक खरातच्या शिवनिका या ट्रस्टच्या रुपाली चाकणकर संचालिका होत्या. त्यावरुन त्यांच्यावर आरोप होऊ लागले. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून त्यांची अडचण वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.





