सोलापूर – शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षाच्या मुलाचे डॉक्टरांकडून चुकीच्या हाताचे बोट कापण्यात आले, निष्काळजीपणाचा हा गंभीर प्रकार सोलापूर जिल्हयातील पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घडला. वर्षा काणे असं शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरचं नाव आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून कुटुंबियांकडून संताप वक्त केला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून, समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एका सहा वर्षाच्या मुलाचे उजव्या हाताचे बोट कापायचे असताना डाव्या हाताचे बोट कापण्यात आले. डॉ. वर्षा काणे यांनी हा महाप्रताप केला आहे. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा पालकांना चुकीच्या हाताचे बोट कापल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पालकांनी तक्रार केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि डॉ. वर्षा काणे विरोधात चौकशी समिती नेमणार असल्याचे जाहीर केले.
शाहू सुनील दंदाडे या मुलाला दोन्ही हाताला सहा बोटे आहेत. त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला वेदना होत असल्याने ते बोट कापून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पालकांनी त्या मुलाला पंढरपूरच्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉ. वर्षा काणे यांनी घोर निष्काळजीपणा केला. त्यांनी अपरेशनदरम्यान मुलाचं उजव्या हाताचं बोट न कापता, डाव्या हाताचं बोटं कापलं, असा कुटुंबियांचा आरोप आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रिया गृहात नेण्यापूर्वी उजव्या हाताच्या बोटावर उपचार होणार असल्याचे निश्चित होतं. मात्र, शस्त्रक्रिया संपल्यानंतर जेव्हा मुलाला बाहेर आणण्यात आलं, तेव्हा उजव्या हाताचं बोट सोडून, डाव्या हाताचं बोट कापून काढलं. मुलगा डॉक्टरांना कोणतं बोट काढायचं हे सांगत असतानाही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन उजव्या ऐवजी डाव्या हाताचे बोट डॉक्टरांकडून काढण्यात आल्याची तक्रार करत दंदाडे कुटुंबीयांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली.
याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन वैद्यकीय अधीक्षक विजय कुमार सरडे यांनी दिलं आहे. मात्र या घटनेमुळे चुमकल्या मुलाला नुकसान झाले असून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.





