भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणीत वाढ; आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

SHARE:

मुंबई – वादग्रस्त आणि आक्षेपाह वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठी भाषिकांना ‘पटक-पटक के मारेंगे’, अशी धमकी दिल्याप्रकरणी निशिकांत दुबे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने नोटीस बजावली असून ७  एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

काही काळापूर्वी खासदार निशिकांत दुबे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना उद्देशून हे वादग्रस्त वक्तव्य केले होतं. मराठी माणसाला पटक-पटक के मारेंगे, अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ज्यावर काँग्रेसच्या महिला खासदारांनी संसद लॉबीमध्ये जाब विचारला होता. या प्रकरणी मनसेचे नाशिक शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांनी निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी ७  एप्रिल रोजी होणार आहे. या सुनावणीसाठी नाशिक जिल्हा न्यायालयाने भाजप खासदार निशिकांत दुबे यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

यानंतर आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी ओडिशाचे दिवंगत मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्यावर अमेरिकेचे सीआयए एजंट असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं.

निशिकांत दुबे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. यात ते म्हणाले कि १९६०  च्या दशकात नेहरू-गांधी कुटुंब अमेरिकेचे एजंट म्हणून काम करत होते. २७ मार्च १९६३ या दिवसी ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री बिजू पटनायक अमेरिकेत दाखल झाले होते. बिजू पटनायक हे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा होते. दुबे यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून बीजेडीच्या खासदारांनी निशिकांत दुबेच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

बिजू पटनायक यांच्यासारख्या आदरणीय नेत्याबद्दल अपमानजनक वक्तव्ये करणाऱ्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काम करणे शक्य नाही, असे सांगत सस्मित पात्रा यांनी राज्यसभा अध्यक्षांना आपला राजीनामा पाठवला आहे. सोमवारी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच, बीजेडी खासदार सस्मित पात्रा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले कि बिजू पटनायक यांच्याबद्दल निशिकांत दुबे यांचे वक्तव्य खोटे, बदनामीकारक आणि बनावट आहे. बिजू पटनायक यांना सीआयए एजंट म्हणणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. सत्ताधारी पक्ष इतक्या खालच्या पातळीवर उतरला आहे. बीजेडी याचा तीव्र विरोध करते. निशिकांत दुबेंनी माफी मागावी, अशी मागणी सस्मित पात्रा यांनी केली.

बिजू जनता दलचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोमवारी निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. दुबे यांचे शब्द अपमानकारक असल्याचे सांगत ते म्हणाले कि या भाजप खासदाराला मनोरुग्णाच्या सल्ल्याची गरज आहे. निशिकांत दुबे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने भाजप बॅकफुटवर आल्यानंतर दुबे सफाई देत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा