बॉक्साईट खाणीविरोधातील आदिवासींच्या आंदोलनाला हिंसक वळण, ५० लोक जखमी तर यात ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

SHARE:

ओडिशा – रायगडा जिल्ह्यात मंगळवारी सिजिमाली बॉक्साईट खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरून पोलीस आणि आदिवासींमध्ये हिंसक संघर्ष उफाळून आला. या घटनेत सुमारे ५० जण जखमी झाले. यात ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने सिजिमाली बॉक्साइट खाण प्रकल्प एका खाजगी कंपनीला सोपवल्यापासून काशीपूर भागातील स्थानिक लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. यामुळेच रायगडा जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉकच्या सागबारी गावात रस्ता बांधकामाविरोधात आदिवासींनी मोठे आंदोलन केले.

मिळालेल्या वृत्तानुसार, वेदांता लिमिटेडच्या खाणकामासाठी बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या बांधकामात अडथळा येवू नये म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित पोलिसांनी गावात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सागबारी गावात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा संघर्ष उफाळून आला. पोलिसांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी रात्रभर पहारा देत असलेल्या गावकऱ्यांनी प्रतिकार केला, ज्यात दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले. जमाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले, ज्यामुळे गावकरी आणखी संतप्त झाले आणि खाणकाम प्रकल्प थांबवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाची तीव्रता वाढली.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याचे बांधकाम थांबवण्याच्या प्रयत्नात आंदोलकांनी कथितरित्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगड, तलवारी, कुऱ्हाडी आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या ४० पोलिसांपैकी १० जणांना डोक्याला दुखापत झाली असून त्यांना रायगडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी दगड आणि विटा फेकून पोलिसांवर हल्ला केला.

एका अधिकाऱ्याने सांगितले की रायगडाचे जिल्हाधिकारी कुलकर्णी आशुतोष सी. घटनास्थळी उपस्थित होते आणि आंदोलन करणाऱ्या आदिवासींशी चर्चा करत होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सागबारी गावात संचारबंदी लागू केली आहे. आता या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या किमान सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ओडिशाच्या रायगडा आणि कालाहंडी जिल्ह्यांमध्ये १,५४९ हेक्टरवर पसरलेल्या प्रस्तावित सिजिमाली बॉक्साइट खाणीचा ५०  वर्षांचा खाणकाम परवाना राज्य सरकारने मार्च २०२३ मध्ये वेदांता प्रायव्हेट लिमिटेडला दिला होता. मात्र स्थानिक आदिवासी आणि अनु.जातीच्या लोक या प्रकल्पाला दीर्घकाळापासून विरोध करत आले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की हा प्रकल्प त्यांची उपजीविका, पाण्याचे स्रोत आणि त्यांचे आराध्य दैवत ‘तिज राजा’ यांचे निवासस्थान असलेल्या सिजिमाली टेकड्यांच्या पवित्रतेला धोका निर्माण करते.

समाजवादी जन परिषदेचे महासचिव अफलातून यांनी या घटनेच्या वृत्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की सागबारी येथील खाण प्रकल्पासाठीच्या रस्ता बांधकामाविरोधात गेल्या तीन दिवसांपासून शेकडो ग्रामस्थ आंदोलन करत असून त्यांनी काम थांबवले आहे. हिंसाचाराची घटना मंगळवारी घडल्याचे वृत्त आहे; त्या दिवशी कोणताही संघर्ष झाला नाही.
त्यांनी आरोप केला की ओडिशा पोलीस आणि सीआरपीएफने काल रात्रीपासून कांतामल गावात क्रूर दमन केले. त्यांच्या मते, पुरुष पोलीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या कंपनीशी संबंधित लोकांनी महिलांना मारहाण केली. त्यांनी दावा केला कि गावकऱ्यांकडे अश्रुधुराच्या वापराचे पुरावे आहेत, जे व्हिडिओमध्ये दिसतात.

घटनास्थळी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी कुलकर्णी आशुतोष सी. यांनी गावकऱ्यांशी अपमानास्पद भाषेत संवाद साधला. कांतामल गावातील लोक आपले गाव सोडण्यास तयार नाहीत आणि त्यांचे आंदोलन सुरूच आहे. गावकऱ्यांना हिंसक म्हणून चित्रित करणाऱ्या माध्यमांच्या वृत्तांवर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की हे वृत्त पोलीस आणि कंपनीकडून मिळालेल्या एकतर्फी माहितीवर आधारित आहे, त्यांनी हे वृत्त फेटाळूल लावले.

Leave a Comment

अधिक वाचा