कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; सिग्नलमध्ये बिघाड करुन प्रवाशांची लूट

SHARE:

मुंबई – कोल्हापूरहून मध्यरात्री पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ प्रवाशांची लुटमार करण्यात आली. सिग्नलमध्ये बिघाड करुन ही ट्रेन थांबवण्यात आली. यानंतर काही संशयीत लोक ट्रेनमध्ये शिरले आणि त्यांनी प्रवाशांकडून सोने, मोबाईल हत्यारांचा धाक दाखवत लुटून नेले. सातारा व सांगली जिल्हयाच्या सीमेवर काही अंतरावर मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून मिरज लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

सह्याद्री एक्सप्रेस पहाटेच्या सुमारास सातारा व सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या शेणाली स्टेशन येथे आली. त्याठिकाणचा सिग्नल बंद होता. त्यामुळे लोकोपायलटला ट्रेन थांबवावी लागली. ट्रेन थांबताच तीन दरोडेखोरांनी ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि प्रवाशांचे दागिने आणि मोबाईल फोन हिसकेले. तीन संशयितांनी ही लूट केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. काही प्रवाशांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण हत्यारांचा धाक दाखवत त्यांनी लूटमार केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेणोली स्टेशन हद्दीतील वरच्या सिग्नलची वायर चोरट्यांनी कट केली होती, तर खालच्या सिग्नलला जाड कापड बांधले होते. सिग्नल मिळत नसल्याने काही तरी धोका असावा, या शक्यतेने मोटर म्हणणे गाडी थांबवली. ती संधी साधून चोरट्यांनी अवघ्या २० ते २५ मिनिटात दरवाजात आणि खिडकी कडेला बसलेल्या प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या.

घटनेची माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पळून गेले. पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. यानंतर सह्याद्री एक्स्प्रेस विलंबाने पुण्याच्या दिशेने रवाना झाली. या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने रेल्वे प्रशासनासमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले असून रात्रीच्या वेळी रेल्वे मार्गावर गस्त वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा