नाशिक – त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भक्तांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला यांना सोमवारी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी अनंता सुरेश मेहंदळे हे आपल्या मित्रांसह दर्शनासाठी आले होते. त्यांनी रितसर २०० रुपयांचा अधिकृत देणगी पास काढला होता. मात्र, रांगेत उभे असताना काही संशयित व्यक्तींनी त्यांना गाठले आणि रांगेतून दर्शनासाठी ४ ते ५ तास लागतील, आम्ही तुम्हाला केवळ १० मिनिटांत दर्शन घडवून देतो, असे आमिष दाखवले. या बदल्यात भाविकांकडून ३ हजार रुपये उकळण्यात आले. प्रत्यक्षात देवस्थान ट्रस्टची अशी कोणतीही ‘पेड दर्शन’ योजना अस्तित्वात नसताना, भाविकांना अनधिकृत मार्गाने प्रवेश देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. या फसवणुकीनंतर मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणात पोलिसांनी सर्वात आधी गोटीराम मनाजी पेहरे आणि पुरुषोत्तम कडलग यांचा पुतण्या अभिषेक कडलग या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून गोटीरामला तत्काळ अटक करण्यात आली, तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये केवळ एका दिवसात तीन वेगवेगळ्या भाविकांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची लूट होत असल्याचे पुराव्यासह उघड झाले. या कारवाईत एका एजंटला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. दरम्यान या संपूर्ण तिकीटाच्या काळाबाजार रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलगचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. त्यानंतर सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलगला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली.
या कारवाईनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी खळबळजनक दावा केला आहे. विश्वस्त निवड प्रक्रियाच आर्थिक व्यवहारातून झाली असून, कडलग यांच्यासह तिघांनी कोट्यावधी रुपये देऊन हे पद मिळवले असल्याचा आरोप शिंदेंनी केला आहे.





