अमरावती जिल्ह्यात प्रशासकीय पुनर्रचना : अचलपूर येथे ‘अपर जिल्हाधिकारी कार्यालय’

SHARE:

अमरावती : जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये आता अचलपूर येथे नवीन ‘अपर जिल्हाधिकारी कार्यालय’ प्रस्तावित करण्यात आले आहे. या नव्या कार्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांची विभागणी दोन मुख्य कार्यालयांमध्ये केली जाणार आहे.

प्रस्तावित; 14 तालुक्यांची होणार नवी विभागणी

प्रस्तावित आराखड्यानुसार, नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय हे अचलपूर येथे असेल. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने मेळघाट आणि परिसरातील 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव, चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांचा समावेश आहे. या दुर्गम आणि मोठ्या तालुक्यांमधील नागरिकांना विविध महसुली व प्रशासकीय कामांसाठी आता थेट अमरावतीला येण्याची गरज पडणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

तसेच मुख्य जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या थेट अखत्यारीत उर्वरित 8 तालुके कायम राहणार आहेत. यामध्ये अमरावती शहर व ग्रामीण, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, तिवसा आणि भातकुली या तालुक्यांचा समावेश असेल. या विभागणीमुळे प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण होऊन कामांचा निपटारा अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

15 दिवसांत हरकती नोंदवण्याचे आवाहन

अचलपूर येथील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्राबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.मिळालेल्या मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याने, नागरिकांनी आपल्या सूचना वेळेत मांडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती यांच्या फेसबुक वॉल वरून.)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा