अमरावती : जिल्ह्यातील उद्योजकांच्या शासकीय विभागाशी संबंधित अडीअडचणी दूर करून औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा उद्योग मित्र समिती तसेच जिल्हा निर्यात प्रचलन समितीची संयुक्त सभा महसूल भवन येथे नुकतीच संपन्न झाली.
अधीक्षक अभियंतांना विशेष सूचना –
नांदगाव पेठ, सातुर्णा व अमरावती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात खंडित वीज पुरवठ्यामुळे उद्योगांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. या समस्येची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी आशिष येरेकर व खासदार अनिल बोंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुढील एक महिन्यात निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यामध्ये 33 केव्हीए बडनेरा सबस्टेशनच्या जागेचा प्रस्ताव, नवीन फीडर तसेच पॉवरहाऊस केबलचे काम तातडीने पूर्ण करून सर्व उद्योगांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ‘सियाराम’ उद्योग घटकाचा वीज पुरवठा दुसऱ्या फीडरवर त्वरित स्थलांतरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना यावेळी दिल्या.
उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना आदेश –
उद्योजकांना महावितरणकडून वीज देयके नियमित तारखेला प्राप्त न झाल्याने, तसेच बिल भरूनही चुकीच्या कार्यपद्धतीमुळे ‘प्रॉम्प्ट पेमेंट’ अनुदान योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. यावर तोडगा म्हणून महावितरणने दरमहा 10 तारखेपर्यंत उद्योजकांना वीज देयके उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून त्यांना शासकीय अनुदान योजनेचा लाभ मिळेल, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच उद्योजकांच्या अडीअडचणींचे नियमित निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक आयोजित करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना देण्यात आले.
केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती –
जिल्ह्यात निर्यात वृद्धी व्हावी यासाठी आयोजित जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या बैठकीत नागपूर येथील विदेश व्यापार महानिदेशालयाच्या उपमहानिदेशक स्नेहल डोके यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे सादरीकरण केले. खासदार अनिल बोंडे व जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना केंद्र शासनाच्या योजनांचा जास्तीत-जास्त लाभ घेऊन जिल्ह्यातील निर्यात वाढविण्याचे आवाहन केले. यावेळी औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, शासकीय विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.






