शेतकऱ्यांना युरोप, चीन दौऱ्याची संधी; २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

SHARE:

अमरावती : कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी या परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांतील शेतीविषयक प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पातळीवर शेती क्षेत्रात होत असलेले बदल आणि नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचवणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या दौऱ्यात परदेशातील कृषी शास्त्रज्ञ व तेथील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, शेतीविषयक विविध संस्था आणि आधुनिक शेतांना प्रत्यक्ष भेटी देणे, परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपल्या उत्पन्नात कशी वाढ करू शकतात, याचे प्रात्यक्षिक व ज्ञान मिळवणे या बाबींचा समावेश राहणार आहे.

लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक –

परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी लाभार्थी स्वतः शेतकरी असावा. अ‍ॅग्रीस्टॅक शेतकऱ्याकडे ‘फार्मर आयडी’ असणे आवश्यक आहे. शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असावे, याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबामधून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. सहलीच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे आणि शेतकऱ्याकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. शेतकरी कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खाजगी संस्थेत नोकरीला नसावा. अर्जासोबत ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी –

याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment