कर्जमुक्तीच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी संभ्रम न ठेवता आधार प्रमाणीकरण करावे; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन..

SHARE:

अमरावती : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ ची अंमलबजावणी जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ७६ हजार ९७६ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आजच्या पत्रपरिषदेत केले.

सहकार विभागामार्फत जिल्ह्यातील १ लाख २४ हजार १४२ शेतकऱ्यांची माहिती महाआयटी पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीनुसार ७६,९७६ शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. यातून अद्यापपर्यंत ४६ हजार ४२१ शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केले आहे. तर ३० हजार ५५५ शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केलेले नाही.

दोन लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी होणारच –

गाव पातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील रक्कम आणि प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यामध्ये तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करताना जी रक्कम स्क्रीनवर दिसेल, ती रक्कम शासन थेट बँकांना देणार आहे. उर्वरित रक्कम ही बँक स्वतः माफ करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या थकबाकीपैकी २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्तीचा पूर्ण लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण बंधनकारक –

कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक असणे आणि आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्वरित जवळच्या ‘आपले सरकार सेवा (सेतू) केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे. कर्जाच्या रक्कमेबाबत किंवा योजनेबाबत कोणतीही शंका असल्यास आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा. तसेच तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयाशीही संपर्क साधता येईल.

तक्रार नोंदवण्याचा प्रकार उपलब्ध –

या व्यतिरीक्त शेतकऱ्‍यांना काही इतर अडचणी ज्यात नाव चुकलेले असणे, कर्जाची रक्कम चुकलेली असणे किंवा खाते क्रमांक चुकलेला असल्यास पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. तसेच त्यांची तक्रार तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयाकडे करावी. त्यावर जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्णय घेण्यात येणार आहे.

बँकांना सहायता कक्ष सुरू करण्याचे आदेश –

सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी शाखेत शेतकऱ्यांच्या मदतीकरीता, त्यांना सल्ला व मार्गदर्शन देण्याकरीता शेतकरी सहायता कक्ष सुरु करावे आणि शेतकऱ्यांना यांना योग्य मार्गदर्शन करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यास यास मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment