नागपूर : ग्रामीण भागातील गोरगरिब जनतेसह शहरी भागातील अनेक कुटुंबांच्या आरोग्यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मोठे योगदान दिले आहे. येथील अनेक कुशल डॉक्टरांनी येथे येणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून त्यांना गंभीर आजारातून बाहेरही काढले आहे. नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक वाटचालीत मेयो चे अमूल्य योगदान असून या हिरक महोत्सवी वर्षात एआय आधारित अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ समारोहात ते बोलत होते. येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. सतिश देवपुजारी, डॉ. भावना सोनवणे, डॉ. राजीव खंडेलवाल, माजी आमदार डॉ. मिलींद माने व मान्यवर उपस्थित होते.
मेयोच्या हिरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ
हिरक महोत्सवी वर्षाचा हा मोठा पल्ला आरोग्याच्या दृष्टीने मेयो ने बजावलेल्या कर्तव्यपूर्तीचा आहे. या वाटचालीला अधोरेखित करतांना हाती घेण्यात आलेल्या अनेक लोकाभिमुख उपक्रमांना व रुग्णांच्या सुविधेकरीता ज्या काही बाबी असतील त्या दृष्टीनेही लवकरच महाविद्यालयाच्या समिती सदस्यांसह चर्चा करुन व्यापक आराखडा तयार करु असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. या महाविद्यालयातून घडलेली अनेक नामांकित डॉक्टरांची फळी आज देशविदेशात कार्यरत आहे. त्यांच्याशी महाविद्यालयाकडून संपर्क साधून रुग्णांवर उपचारासाठी आवाहन केल्यास तेही आपली सेवा उपलब्ध करुन देऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करुन अधिष्ठाता रवी चव्हाण यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.

यावेळी हिरक महोत्सवाचे औचित्य साधून सुरु केलेल्या डीजीटल मॅमोग्राफी, पेन क्लिनीक, सेंट्रल क्लिनीकल लॅबरोटरीचा रिपोर्ट पेशंटच्या मोबाईलवर उपलब्ध करुन देणाऱ्या ॲपचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. प्रीनेटल अर्थात गर्भावस्थेतील बालकाच्या हिमोग्लोबीनोपॅथीचे अचूक निदान करणारे हे भारतातील क्रमांक एकचे हॉस्पिटल असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ. गोपाल अग्रवाल यांनी केले.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर.)
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.







1 thought on “सर्वसामान्य गोरगरिब जनतेला उपचारासाठी मेयोमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करु – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे”
[914584]supplies professional anti-violence equipments and solutions for the whole world with strong and perfect production capacity. anti-violence.org