रक्षाबंधन…
बंध रेशमी धाग्याचे
बंधूभाव तो प्रितीचा,
घरा आनंदी सोहळा
भाव हृदयी राखीचा ||१||
बहिणीचा पाठीराखा
जसा साथी हनुमान |
नाते हृदयी जपतो
जगी वाढवितो शान ||२||
भाऊ असता दुःखात
होती बहिण बावरी ।
देवा मागणं मागती
कर कृपा भावावरी ||३||
संकटात जणू ढाल
उभी होती भावासाठी |
सुख दुःखात सोबती
वाट पाहे भेटीसाठी ||४||
कर भावाचे रक्षण
ठेव सुखी समाधान |
धन आरोग्य संपत्ती
हेची देवा दे रे दान ||५||
दुःखी बहिण दिसता
झोप भावाची उडती ।
गोड भाकर सुखाची
नाही गळा उतरती ||६||
लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९
Author: संजय अण्णाजी देशमुख
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..






