ओवी ज्ञानेशांची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची..

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

       भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला.आणि तुकाराम हे त्या मंदिराचे कळस झाले. पायापासून ते कळसापर्यंत भागवतधर्माला  पोचविणारे पाच संत कवी म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास हे आहेत. प्रत्येक संताच्या चरित्राचे आणि त्यांच्या अभंग काव्यांचे स्वभाव वैशिष्ट्य वेगवेगळे आहे. याशिवाय महाराष्ट्रात आणखीही बरेच संत होऊन गेले. महाराष्ट्रातील अध्यात्मिक लोकशाहीने या सर्व संतामधून  वरील पाच संतानाच मुगुटमणी म्हणून निवडून काढले आहे.

    संत तुकाराम महाराजांच्या अभंग साहित्याचा अभ्यास करताना संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ इत्यादी संतांच्या पावलावर पाऊल ठेवून तुकाराम पुढे जाताना दिसतात तर कधी अगदीच आगळे वेगळे  लिहिताना दिसतात. काही पाठ केली संतांची वचने असे स्वतः सांगतात.

  साधक दशेत असताना तुकारामांनी ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत या दोन ग्रंथांची अनेक पारायणे देहूच्या परिसरातील डोंगरावर एकांतात राहून केली. ज्ञानेश्वर आणि एकनाथ या दोन संतांच्या साहित्य कृतीच्या अखंड मननाने त्यांच्या मुखी ओव्या अशा काही बसून गेल्या की त्यांच्या तोंडून त्या अभंग रूपाने बाहेर पडू लागल्या.

जैसे भ्रमर भेदी कोडे l
भलतैसे काष्ठ कोरडे ll
परी कळीके माजी सापडे कोवळीये ll (ज्ञानेश्वर)

जो शुष्क काष्ठ स्वये कोरी l
तो कोवळ्या कमळा माझारी ll
भ्रमर गुंतला प्रीतीवरी l
केसर माझारी कुचंबो नेदी ll (नामदेव)

वरील दोन्ही ओव्यांचा सुंदर संगम तुकाराम महाराजांच्या पुढील वचनात अतिशय सूत्रबध्द रीतीने झालेला आहे.
नाही काष्ठाचा गुमान l
गोवी भ्रमरा सुमन ll
तुकारामांची अभंगवाणी ही ज्ञानेश्वरांच्या ओवी इतकीच लोकप्रिय आहे. कारण ज्ञानेश्वर एकनाथांच्या ओविपेक्षाही ती तुलनेने समजण्या साठी अधिक सुलभ आहे. म्हणूनच अभ्यासकांनी म्हटलेले आहे.
ओवीज्ञानेशांची, अभंगवाणी प्रसिद्ध तूकयांची…

ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकारामांचे अभंग दोघानाही सारखेच महत्व आहे. किंबहुना महाराष्ट्रातील लक्षावधी भाविक भक्तांच्या जीवनाला गेली कित्येक शतके तुकारामांच्या वाणीने मनःशांती मिळवून दिलेली आहे. अनेकांना आयुष्यात तुकारामांची अभंगवाणी  मार्गदर्शक सुध्धा ठरलेली आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी संत तुकारामांच्या अभंगवणीची पारायणे होत असतात.

     ज्ञानेश्वरीच्या रूपाने उगम पावलेली काव्यगंगा नाथभागवताच्या प्रवाहाने पुढे पुढे वाहत जाऊन संत तुकारामांच्या  पवित्र मुखातून भक्ती सागरास मिळाली आहे. उगमापासून ते संगमापर्यंत ही काव्यगंगा  अतिशय आखीव रेखीव  आहे. ही काव्य गंगा पुढे नाथांच्या स्वभावाप्रमाणे पुढे ऐसपैस होत विस्तारत जाताना दिसते.

  संतचरित्रकार महिपतबोवाही सांगतात की “तुकारामांनी ज्ञानदेवांच्या पूर्वीचे ग्रंथ महत्प्रयासाने मिळवून नीज प्रीतीने पठण केले आहेत. तुकारामही सांगतात,

“झाडू संतांचे मारग l
आडरानी भरले जग l
उच्छीश्टांचा भाग l
शेष उरला तो सेवू ll”

    सर्व संतांनी जे भक्ती युक्त अभंग साहित्य निर्माण केले. त्यावरून सर्व संतांचे अध्यात्मिक अंतरंग एकच आहे,असे दिसून येते. परंतु प्रत्येक संतांचे वैशिष्ट वेगळे आहेच. या दृष्टी कोनातून पाहिल्यास महाराष्ट्रातील संत कवींच्या मालिकेत संत तुकाराम महाराजांचे  व्यक्तित्व निश्चितच वेगळेपणाने उठून दिसते.

लेखिका –
प्रा. डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
साहित्यिक व कवी

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment