विचार संपदा…
साऱ्या जगात नीतिमत्तेच्या बाबतीत भारत देश अग्रेसर होता. पूर्वीच्या काळी ग्रीक राजदूत मेगास्थेनिसने याबाबत लिहून ठेवले आहे. आज मात्र सगळीकडे भ्रष्टाचारराने धुमाकूळ घातला आहे. दैनंदिन व्यवहार घ्या, सरकारी कार्यालय घ्या, पैशाशिवाय कामच होत नाही ही वास्तवता आहे. विचारवंत सांगून गेले, पैसा नसेल तर झोपडपट्ट्या खूप वाढतील.
परंतु, नैतिकता नसेल तर, मानसिक झोपडपटटया निर्माण होऊन विकृती येईल आणि त्या खूप घातक असतील. Mental slums are more dangerous than material slums. भ्रष्टाचाराची एक गोष्ट आठवली. राजवाड्यापासून जवळच एक जंगल होते थंडीच्या दिवसात जंगलातील जनावरे ओरडू लागली. राजा म्हणाला, प्रधानजी.. जनावरे का ओरडतात. प्रधानजी म्हणाला, महाराज, जनावरे थंडीने गारठली आहेत. त्यामुळे ओरडतात. त्यांचे ओरडणे बंद करण्यासाठी प्रधानजी आपल्याला काय करता येईल. प्रधानजी म्हणाला, राजसाहेब, सर्व जनावरांना ब्लॅंकेट देऊ. राजाने भरपूर आर्थिक रक्कम मंजूर केली. प्रधानाने ती रक्कम गट्ट केली आणि राजाला सांगितले सर्व जनावरांना ब्लॅंकेट वाटप केले आहे.
परंतु रात्रीच्या वेळेस जनावरांचा पुन्हा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. राजा म्हणाला प्रधानजी, ब्लँकेट देऊनही प्राणी का ओरडतात प्रधानजी म्हणाले, राजेसाहेब ब्लॅंकेट मिळाले म्हणूनते आनंदात आहेत. देशामध्येही कमी जास्त प्रमाणात तेच चालले आहे. भ्रष्टाचाराचे तिमिर जावो, सदाचाराचा सूर्य उगवो, नीतीच्या तेजाने तळपो आपला भारत. अशा प्रकारचे पसायधन विश्व प्रभू जवळ मागण्याची वेळ आली.
लेखक –
डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,
संत साहित्य उपासक
संपर्क – ९४०४५५३५०५
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.






