मानवी आयुष्यात स्त्री पुरुषांच्या जीवनात दुर्दैवी घटना घडतात. जीवनासाठी एकमेकांना घटस्फोटाच्या किंवा मृत्यूच्या कारणाने सोडून जातात, हा फार मोठा अपघात असतो. काही त्यातून सावरतात, काही कायम दुखी होतात. मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो, तो चांगल्या रीतीने जगावा.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे तो एकटा राहू शकत नाही. चांगली सोबत मिळाली तर एकमेकांच्या सोबतिने त्याच्या आयुष्याचा काळ चांगला व्यतित होतो. आयुष्यातील अनेक अवघड प्रश्न सुटतात. आयुष्यात विधुर किंवा विधवा म्हणून एकटे राहण्याचा प्रसंग आला तर पूनर्विवाह हा त्यावर उत्तम पर्याय आहे.
पूनर्विवाह –
पुनर्विवाह म्हणजे एकल आयुष्या साठी एक नवी पहाट असेल. फक्त विचार सकारात्मक ठेवण्याची नि लोक काय म्हणतील याचा विचार न करण्याची गरज आहे. मग आयुष्याचा बगीचा फुलून जीवन सुगंधित होईल. पुनर्विवाह म्हणजे यशस्वी जीवनाची आणि नव्या आयुष्याची हिमत आहे. आयुष्य एकदा संपले असे वाटले तरी पुनर्विवाहाने ते पुन्हा फुलू शकते.
घटस्फोट किंवा वैधव्य हा आयुष्याचा शेवट नाही तर एक थांबा आहे –
पुनर्विवाह करून जोडीने आनंदाने जगण्याचा दुसरा हक्क आहे. समाज काय म्हणेल यापेक्षा मन काय म्हणते हे सुदृढ आरोग्यमय जीवनासाठी महत्वाचे आहे.
पुनर्विवाह म्हणजे जुन्या जखमांवर नव्या प्रेमाची फुंकर आहे. एकटेपणापेक्षा योग्य जोडीदारासोबतचे आयुष्य केव्हा चांगलेच. स्त्री असो वा पुरुष दोघांनाही पुन्हा लग्न करण्याचा व प्रेम करण्याचा अधिकार आहे.. मूल असतील तरीही आई वडीलांनी आपल्या सुखाचा विचार करायला हवा. पुनर्विवाहामुळे मुलांनाही पुन्हा पूर्ण कुटुंब मिळते. आयुष्य खूप सुंदर आहे. एकटे राहून व्यथा होण्यापेक्षा जोडीने आनंदाने जगावे. लग्न हे बंधन नसून दोन जीवन एकमेकांचा आधार आहे. आधार तुटला तर नवीन आधार शोधणे गुन्हा नाही. पुनर्विवाह करणाऱ्यांच्या चारित्र्यकडे संशयाने न बघता समाजाने त्यांना आधार द्यावा. त्यामुळे नवविवाहित विधुर विधवा जोडपे अधिक मोकळेपणाने जगतील. त्यांच्यात जगण्याची जिद्द निर्माण होईल.
पहिल्या लग्नाच्यावेळी झालेल्या चुका दुसऱ्यांदा टाळता येतात – दुसऱ्या लग्नाच्या वेळी स्त्री पुरुष जास्त समजूतदार,परिपक्व झालेले असतात. एकमेकांना समजून घेण्याची पात्रता त्यांच्या मध्ये आलेली असते. पुनर्विवाह लपविण्याचा नाही तर अभिमानाने सांगण्याची गरज आहे. पुनर्विवाहाला समाज जर विरोध करत असेल तर तो समाज मागास आहे असे समजावे. सर्व सुशिक्षित जर असा चांगला विचार करतील तर समाजात पुनर्विवाह घडून येतील. सुशिक्षितापेक्षा अशिक्षित मात्र पुनर्विवाहास सहज पाठिंबा देतात.
पुनर्विवाहाला पाठिंबा देणे म्हणजे माणुसकिशी नाते जोडून मानवतेला पाठिंबा देणे होय –
विधुर, विधवा प्रत्येकाला आपले आयुष्य नव्याने सुरुवात करण्याचा अधिकार आहे. सर्वांनी लक्षात ठेवावे जिथून सुरुवात कराल तिथून नव्या आयुष्याची पहाट असेल…
लेखक –
प्रा. डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.





