अमरावती : शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेले शिक्षक दिन विशेष ऑनलाइन कविसंमेलन काल, ५ सप्टेंबर रोजी Google Meet च्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. रात्री ठीक ८ वाजता सुरू झालेल्या या कविसंमेलनाची सांगता रात्री १०.३० वाजता झाली.

शिक्षक, प्राध्यापक आणि साहित्य क्षेत्रातील कार्यरत सारस्वतांच्या सहभागाने रंगलेल्या या कविसंमेलनातून शिक्षकांच्या ज्ञानदानाला, संस्कारक्षम कार्याला आणि समाज घडविण्यातील योगदानाला काव्यरूपाने मानाचा मुजरा करण्यात आला. विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या निमंत्रित कवींनी शिक्षकांविषयीच्या भावना आपल्या आशयपूर्ण आणि भावस्पर्शी कवितांमधून व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मंदा नांदूरकर होत्या. सुप्रसिद्ध साहित्यिक तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती च्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मोनाताई चिमोटे यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक रविंद्र जवादे उपस्थित होते. त्यांच्या ललित लेखसंग्रहाचा गोवा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल यावेळी त्यांच्या सन्मानार्थ विशेष कविता सादर करून ॲड. नीता कचवे यांनी रविंद्र जवादेंचा बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे सन्मान केला.

प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रवीण गुल्हाने, प्राचार्या शारदा गणोरकर, प्रा. पद्मिनी दुरुखकर, प्रा. स्मिता शहाणे यांची उपस्थिती लाभली. पाहुण्यांचे स्वागत संगीततज्ञ गझलकारा रोशनी कडू यांनी स्वागतगीताने केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांधिलकी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. नीता प्रफुल्ल कचवे यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी हितेश गोमासे (नागपूर) यांनी प्रभावीपणे केले.
कविसंमेलनात योगिता निपाणे (अमरावती), स्वाती सेलेकर (नागपूर), रसिका पानके (चांदूर बाजार), मंगला नागे (अंजनगाव), हितेश गोमासे (नागपूर), प्रणाली चव्हाटे (नागपूर), राणी नागापुरे (अमरावती), राहुल गवस (नागपूर), , मयूरी ठाकरे (नागपूर), आणि प्रा. रोशनी गतकणे (नागपूर) या निमंत्रित कवींनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक तथा राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका डॉ. शोभाताई गायकवाड आणि सुप्रसिद्ध साहित्यिक प्रफुल्ल ठाकरे यांनीही कविता सादर केल्या.

शिक्षकांच्या कार्याला समर्पित या काव्यमय उपक्रमाला साहित्यप्रेमी, शिक्षक आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऑनलाइन माध्यमातूनही साहित्यिक कार्यक्रम प्रभावीपणे आणि दर्जेदार पद्धतीने साकारता येतो, याचा प्रत्यय या कविसंमेलनातून आला. रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

रात्री १०.३० वाजता डॉ. सिम्रेला देशमुख यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली. बांधिलकी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. नीता प्रफुल्ल कचवे यांनी कविसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष, प्रमुख अतिथी, निमंत्रित कवी, सूत्रसंचालक, आभारप्रदर्शक तसेच सहभागी सर्व शिक्षक, साहित्यिक आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

‘शिक्षक हा केवळ ज्ञान देत नाही, तर तो आयुष्य घडवतो’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेले हे शिक्षक दिन विशेष ऑनलाइन कविसंमेलन संस्मरणीय ठरले.
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे
लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.





