सर्वच संतांच्या जीवन चरित्रात गुरू कृपेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, असे दिसून येते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, आदी संतानी गुरुकृपेचे महत्त्व सांगितले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की,
सद्गुरुराये कृपा मज केली l
परी नाही घडली सेवा काही ll
मागती तूप पावशेर l
पडिला विसर स्वप्नामाजी ll
संत तुकाराम महाराजांना गुरूपदेश स्वप्नात झाला. कारण ते सांगतात “मानियेला स्वप्नी गुरूचा उपदेश” ते गंगा स्नानाला जात असताना हा गुरूपदेश त्यांना झाला. देहूला इंद्रायणी नदी असल्याने गंगा स्नान म्हणजे इंद्रायणी स्नान असाच अर्थ घ्यावा लागेल. स्नानाला जात असताना सद्गुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. याचाच अर्थ सद्गुरूंनी त्यांच्यावर कृपा केली.
“राघव चैतन्य, केशव चैतन्य l
सांगितली खुण मालिकेची ll” सद्गुरूंनी तुकारामाला ‘राघव चैतन्य – केशव चैतन्य’ ही आपल्या मालिकेची खुण सांगितली. बाबाजी हे आपले नाव सांगुन तुकारामांच्या आवडीचा “रामकृष्ण हरि” हा सोपा मंत्र दिला..
स्वप्नातच सद्गुरूंनी भोजनासाठी ‘पावशेर तूप’ मागितले. पण तुकारामास त्याचा विसर पडला व त्यामुळेच आपल्या हातून गुरुसेवा घडली नाही.
“काही कळे उपजला अंतराय l
म्हणोनिया काय त्वरा झाली ll”
म्हणून सदगुरू अंतर्धान पावले असावेत असे तुकारामांना वाटते. यातून तुकारामांचा स्वभाव किती सालस, निरागस आणि भाबडा आहे हे दिसून येते. स्वप्नातही आपल्या हातून चूक होऊ नये. झाली तर त्यांच्या मनाला किती यातना होतात, तुकारामाच्या मनीचा हा भाव जाणून बाबाजीनी तुकारामांना त्याच्या आवडीचा ‘रामकृष्ण हरी’ हा सोपा मंत्र सांगितला. यामुळे आपल्यावर गुरुकृपा झाली. असे वाटून गुरुकृपेमुळेच भाग्य उजळून निघाले व अवघी चिंता सरली व पद्नभाचा लाभ झाला असे तुकारामांना वाटते. तुकारामाच्या आयुष्यात गुरुकृपेचा प्रसंग माघ शुद्ध दशमी, गुरुवार या दिवशी घडून आला.
संत तुकारामांना गुरुप्रसादामुळे अनेक फायदे झाले. जीवनात गुरुप्रसादाची आवश्यकता आहे, हे तुकारामांनी अनेक अभंगातून अतिशय नम्रपणे नमूद केले आहे. गुरुप्रसादामुळे संत समागम होऊन संत समागम घडला. ज्याप्रमाणे चंदनाने बोरीला व्यापून चंदनरूप करावे. त्याप्रमाणे संतानी तुकारामाला जवळ करून त्यांच्या सारखेच केले असे त्यांना वाटते.
“माझिया मनीचा जाणोनिया भाव l
तो करी उपाव गुरुराव ll
आवडीचा मंत्र सांगितला सोपा l
जेणे नोहे गुंता काही कोठे ll”
गुरूकृपा झाल्यानंतर तुकारामांना असे वाटते की संतानी त्यांच्या गुणदोषांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पायाशी ठेवून घेतले. गुरू रायांनी तुकारामांच्या मनातील भाव जाणून घेतला आणि आवडीचा सोपा, ज्यात कोणताही गुंता पडणार नाही असा मंत्र सांगितला. या मंत्रामुळे तुकारामाना भवसागर तरुण जाण्यासाठी सामर्थ्य दिले. पांडुरंग या समर्थ दैवतापर्यंत ते पोचले.
गुरूपदेश झाल्या नंतर तुकारामांच्या मुखातून प्रासादिक उत्तरे बाहेर पडू लागली. जणू देवच त्यांच्या मुखे बोलू लागला. तुकारामांची वाणी लोकांना खूप आवडू लागली. परंतु तुकाराम सर्वांना सांगू लागले की हे शब्द भंडार माझे नसून विठ्ठलाचे आहे. मी केवळ भारवाही हमाल आहे.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
संत साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.





